जागोजागी शेकडो जीवघेणे खड्डे : राज्य महामार्गाची दुरवस्था

भगवान जगदाळे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सायंकाळनंतर वाहनचालक  या महामार्गाने प्रवास करायला अजिबात धजावत नाही. यापूर्वी अनेकदा अपघातांची मालिका घडूनही त्यातून बोध घेतला जात नाही. शासन व प्रशासन अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट बघतेय तेच कळत नाही...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : शिरपूर ते शहादा या 60 किलोमीटर अंतराच्या राज्य महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून जागोजागी शेकडो जीवघेणे खड्डे पडल्याने प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत शासन व प्रशासनही ढिम्म असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

शिरपूर-शहादा राज्य महामार्ग हा महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशला जोडणारा एक महत्वपूर्ण दुवा असून धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांसह संपूर्ण खान्देशाला जोडणारा राजमार्ग आहे. परंतु त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पावसाळ्यात तर अपघातांचे प्रमाण खूपच वाढते. सायंकाळनंतर वाहनचालक  या महामार्गाने प्रवास करायला अजिबात धजावत नाही. यापूर्वी अनेकदा अपघातांची मालिका घडूनही त्यातून बोध घेतला जात नाही. शासन व प्रशासन अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट बघतेय तेच कळत नाही...

महामार्गालगत वाघाडी, वरुळ, भटाणे, तऱ्हाडी, बामखेडा, वडाळी, कुकावल आदी गावे असून तेथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होते. जर एखादे आजारी इमर्जन्सी पेशंट असेल तर ते रस्त्यातच दगावण्याची मोठी शक्यता आहे. प्रवाशांसह दुचाकीस्वार व इतर लहान वाहनधारकांनाही त्याचा मोठा त्रास होतो. रस्ता दुरुस्तीसाठी अजून किती दिवस वाट पहावी लागेल ? असा सर्वसामान्यांचा सवाल आहे. संबंधित विभागासह शिरपूर व शहादा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष घालावे व जनसामान्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवावा. अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे...

Web Title: dhule news state highway bad conditions