उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे सुविधांचे सुरेश प्रभूंच्या हस्ते ई- भूमीपूजन, लोकार्पण

निखिल सुर्यवंशी
रविवार, 30 जुलै 2017

देशात सध्या 42 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून पुढील पाच वर्षात हेच प्रमाण 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा मानस आहे

धुळे : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी जिल्हा दौऱ्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विविध सेवासुविधांचे ई- भूमीपूजन आणि ई- लोकार्पण झाले. आगामी काळात रेल्वेचे विद्युतीकरण, गती वाढविणे, अधिक गर्दीच्या ठिकाणी ती विभागली जाण्यासाठी दुहेरी किंवा तिहेरी मार्गाची सुविधा निर्माण करणे आणि भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन फ्रान्सच्या मदतीने भारतात तयार करण्यावर भर असेल, असे ते म्हणाले. 

मंत्री प्रभू म्हणाले, की रेल्वेने पायाभूत सेवांमध्ये गुंतवणुकीस सुरवात केली. यातून रोजगार निर्मिती होईल. जगात सर्वांत चांगले डिझेल आणि इलेक्‍ट्रिक "लोकोमोटिव्ह' भारतात तयार होणार असल्याने लघु उद्योगांना चालना मिळेल. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकता या मार्गावरून मोठया प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रेल्वे गाड्यांची गती वाढविण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. देशात सध्या 42 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून पुढील पाच वर्षात हेच प्रमाण 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा मानस आहे. देशात 16 हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण व तिहेरीकरण करण्यास परवानगी देण्यात आली असल्याने प्रवासी वाहतूक जलद गतीने होणार आहे. देशात 40 हजार कोचेसची दुर्दशा झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

प्रवाशांना स्वस्तात पिण्याचे पाणी, रेल्वे स्टेशन वर वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. आगामी काळात रेल्वेत वाय-फाय सुविधा, करमणुकीचे साधने, नवीन केटरिंग धोरणातून चांगली खानपान सेवा देण्यावर भर आहे. अपारंपरिक स्त्रोतांमधूनही उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होत असून या माध्यमातून 40 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. जगातील पहिली सोलर पॅनेल असलेली रेल्वे सुरू केली असून कचऱ्यापासून वीज निर्मितीवर भर दिला जात आहे. रेल्वेचे विद्युतीकरण केल्यामुळे भविष्यात डिझेल कमी लागेल. खर्चात बचत होईल. रेल्वेच्या मीटरगेज मार्गांचे रूपांतर ब्रॉडगेज मार्गामध्ये करण्यात येत असून रेल्वेच्या कामांचे सर्व कंत्राट ई- निविदेद्वारे दिली जात आहेत. महाराष्ट्रात रेल्वेच्या माध्यमातून 1 लाख 36 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असून त्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. सांडपाण्याच्या पुर्नवापरामुळे रेल्वेचे दरवर्षी 300 ते 400 कोटी रुपये वाचतील. प्रवाशांच्या माहितीसाठी दोन लाख डिजिटल स्क्रीन लावण्यात आले आहेत. 

सुविधांचे ई- उद्‌घाटन 
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील विविध उपक्रमाचे भूमिपूजन, महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला धुळे येथून दोन स्लिपर डबे जोडून धुळे- पुणे सेवेचा शुभारंभ मंत्री प्रभू यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाला. तसेच बालकवी स्वर्गीय त्र्यं. ब. ठोंबरे यांच्या भादली रेल्वे स्थानक येथील स्मारकाचे भूमिपूजन रिमोटद्वारे झाले. जळगाव- मनमाड मार्गावर तिसरी लाइन, धुळे- चाळीसगाव मार्गाचे विद्युतीकरण, जळगाव येथे ऐस्केलेटर बसविण्याचा शिलान्यास, तसेच भुसावळ येथे सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, नाशिकरोड, जळगाव आणि भुसावळ या स्थानकावरील लिफ्टचे उद्‌घाटन, धुळे येथे कॉम्प्युटर आधारित उद्‌घोषणा प्रणाली आणि जीपीएस घड्याळ, मनमाड येथील फलाट क्रमांक 1 चा 18 डब्यावरून 26 डब्यांसाठी विस्तार, भुसावळ मंडळातील 50 रेल्वे स्थानकांवर ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाइट बसविणे, भुसावळ येथील पादचारी पूल, भुसावळ, मनमाड आणि नाशिक रोड स्थानकांवर आठ वॉटर वेंडीग मशिन सुरू करणे, भुसावळ विभागातील 15 स्थानकांवर बाल आहार खोल्यांचे मंत्री प्रभू यांच्या हस्ते ई- लोकार्पण झाले. 

मागण्या, अपेक्षा
जळगाव- उधना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होताच या मार्गावरून भुसावळ- जळगाव- नंदुरबार- उधना- बांद्रा अशी भुसावळ- मुंबई नवी गाडी सुरू करण्यात येईल. तसेच दादर- अमृतसर एक्‍प्रेसला धुळ्याहून एक एसी प्रथम श्रेणी व एसी द्वितीय श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येईल. धुळे- पुणे कोचला मिळणारा प्रतिसाद पाहून आवश्‍यकता भासल्यास या डब्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही मंत्री प्रभू यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत खासदार ए. टी. पाटील यांनी चाळीसगाव- औरंगाबाद, धुळे- अमळनेर रेल्वे मार्गास प्राधान्य द्यावे, भुसावळ- जळगाव दरम्यान चौथ्या मार्गासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाप्रमाणेच मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी केली. नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी नंदुरबार येथून मुंबई व पुणेसाठी रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी केली. आमदार अनिल गोटे यांनी मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग जेएनपीटी येथून जाणाऱ्या कंटेनरच्या वाहतुकीसाठी सोयीचा असल्याचे सांगितले. मालेगाव- चिंचपाडा मार्ग मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महापौर कल्पना महाले, पालकमंत्री दादा भुसे, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

Web Title: dhule news suresh prabhu e-launch railway facilities