तहसीलदार देवरेंचे काम युवकांसाठी प्रेरणादायी..!

दगाजी देवरे
मंगळवार, 11 जुलै 2017

स्पर्धा परीक्षांच्या वातावरणामुळे अभ्यास करता आला. हे करताना M. SC. च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. M. sc. Agri.ला सुवर्णपदक मिळवत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.

म्हसदी (धुळे) : ग्रामीण भागात राहूनही अनेक विद्यार्थी जिद्द, परिश्रमातून यश मिळवतात. शैक्षणिक वातावरण खेड्यातील असले तर विद्यार्थी संधीचं सोनं करतात. म्हसदी (ता. साक्री) येथील तरुण प्रथम नायब तहसीलदार झाला आणि आज तहसीलदाराची जबाबदारी असताना ते तरुणाईला एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षेसाठी मार्गदर्शन करत आहेत. कमी वयात आज तहसीलदार झालेल्या तरुणाचा सघंर्ष युवकांना प्रेरणा देणारा आहे.

प्राथमिक शाळेपासून जिद्द. . . !
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेपासून नितिनकुमार राजाराम देवरे यांची शिकण्याची जिद्द होती. केवळ शिकून नोकरी न करता गावासाठी काही तरी करावे म्हणून आजही ते प्रयत्नशील आहेत. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक तर आई माध्यमिक शिक्षिका होत्या. म्हणून घरात शैक्षणिक वातावरण सुरुवातीपासून होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत शिक्षण घेतले. शाळेत शिक्षक कै. देवराम ब्राह्मणे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात गणिताचा पाया पक्का केला. वडील राजाराम माणिक देवरे व आई सिंधुबाई देवरे यांनी इंग्लिश विषय पक्का करून घेतला. या शाळेनेच स्पर्धा परीक्षेची बीजे मनात पेरली. शाळेतील नाटकाच्या सहभागामुळे अभिनयाची आवड आजही कायम आहे. शिक्षिका आईच्या संस्कारांनी आणि शिस्तीमध्ये वाढलो. आजोबा, धुळे येथील जय हिंदचे माजी प्राचार्य कै. आर. डी. देवरे व आजी कै. डॉ. उषाताई देवरे यांच्या प्रेरणेने सातवीला जयहिंद हायस्कुल धुळे येथे प्रवेश घेतला. जयहिंद बोर्डिंगला राहत काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला. यापूर्वी जयहिंदच्या अभ्यासू वातावरणापासून वाचण्यासाठी आपले शिक्षण सोडून बहुतेक जण गावात आले होते.
याचदरम्यान पोलंडस्थित चुलतभाऊ अविनाश देवरे यांची चांगली साथ मिळाली. सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात चौथा क्रंमाक पटकावला. यामुळे मला चांगला आत्मविश्वास मिळाला. जयहिंदला 12 वी पूर्ण करून कृषी महाविद्यालय अकोला येथे B. Sc. Agri. ला प्रवेश मिळाला. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला वाव मिळाला. दुसऱ्या वर्षापासूनच MPSC करून अधिकारी बनण्याचा निश्चिय केला. 'भाऊ तुला काहीतरी करून दाखवायचं आहे' या आईच्या शब्दांनी सतत प्रेरणा दिली. B. SC. Agri.ला 82% पास झाल्यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठात M. SC. Agri.साठी सहज प्रवेश मिळाला. Agronomy (कृषिविद्या) हा विषय मिळाला. स्पर्धा परीक्षांच्या प्रचंड वातावरणामुळे अभ्यास करता आला. हे करताना M. SC. च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. M. sc. Agri.ला सुवर्णपदक मिळवत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.

नायब तहसीलदार आणि तहसीलदार 
2006 मध्ये नायब तहसीलदार (वर्ग 2) म्हणून नियुक्ती, 7 नोव्हेंबर 2007ला अमरावती विभागात नियुक्ती झाली. 2014 मध्ये तहसीलदार (वर्ग १) पदोनती झाली. 2016 पासून अक्कलकुवा तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. महसूल विभागात विशेषतः नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आदिवासींसाठी काम करायचे आहे. त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी कॅम्प आयोजित करणे, वेळोवेळी धान्य वितरीत करणे, सरदार सरोवर पुनर्वसन कामे पूर्ण करणे आदी कांमाना वेळ दिला जातो.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेबसाईटने मार्गदर्शन ग्रामीण भागातील MPSC, UPSC करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी youtube वरून मार्गदर्शनपर व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले जाते. स्पर्धा परीक्षेसंबधी पुस्तकांचे लिखाण केले असून आहे. नुकतेच 'अंकगणित स्पर्धापरीक्षांचे' पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. सध्या mpsc-2या पुस्तकांचे नियोजन सुरू आहे.
महाविद्यालयीन जीवनावर "अॅग्रीकॉस" नावाची कादंबरी लिहीत असल्याचे देवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. तरुणांच्या रोजगारांसाठी, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन वर्ग, करिअर गाईडन्स अकादामी आदी काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: dhule news tehsildar nitin deore sakri mhasdi