हातपंपावर वीज पंप बसवून पाणीपुरवठा करणार

दीपक कच्छवा
गुरुवार, 22 मार्च 2018

दरातांडा येथील हातपंपाला पाणी चांगले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून या हातंपंपावर वीजपंप बसवून शंभर मीटर पाइपलाइन करण्यात येणार आहे. हातपंपाचे पाणी पाण्याच्या टाकीत टाकून तांडावासीयांना पुरवठा केला जाईल. 
- आर. सी. पाटील, सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, चाळीसगाव.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दरातांडा येथील पाणीटंचाई संदर्भात "सकाळ'मध्ये वृत्त झळकताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर. सी. पाटील यांनी दरातांडा येथे जाऊन आज पाहणी केली. तांड्यातील हातपंपावर लगेचच वीज पंप बसवून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरातांडा (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. जवळच्या काही विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. या संदर्भात "सकाळ'मध्ये 19 एप्रिलच्या "टुडे' पानावर "दरातांडा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. यात महिलांच्या वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया घेऊन वस्तुस्थिती मांडल्यामुळे गावातील सर्वांत मोठी पाण्याची समस्या समोर आली. या वृत्ताची पंचायत समिती प्रशासनाने दखल घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर. सी. पाटील यांच्यासह राहुल बागूल, ग्रामपंचायत सदस्य किसन राठोड, रूपसिंग जाधव, ग्रामसेवक वासुदेव पाटील यांनी तांड्यावर पाहणी केली. तांड्यावरील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य असल्याने हे पाणी टाकीत टाकून त्याद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे दोन दिवसात ही समस्या सुटेल, असे आर. सी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

"सकाळ'च्या वृत्ताचे कौतुक 
दरातांड्यावर बंजारा समाजाची लोकवस्ती आहे. त्यात ऊसतोड कामगार कुटुंबीय अधिक आहेत. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव असल्याने आजपर्यंत पाणी प्रश्नाबाबत आवाज उठविला जात नव्हता. स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही दखल घेतली जात नव्हती. अखेर "सकाळ'ने तांड्यावरील वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडल्यामुळे गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासंदर्भात प्रशासनाने दखल घेतली. त्यामुळे "सकाळ'च्या वृत्ताचे ग्रामस्थांनी कौतुक केले. 

हातपंप ठरणार संजीवनी 
दरातांडा येथे असलेला हातपंपाला चांगले पाणी आहे. मात्र, तांडा वस्तीपासून हा हातपंप दूर अंतरावर असल्याने महिलांचे पाणी आणण्यासाठी खूप हाल होतात. त्यामुळे या हातपंपावर वीजपंप बसवून त्याचे पाणी तांडावासीयांना मिळणार असल्याने हा हातपंप तांडावासीयांसाठी संजीवनी ठरणार आहे. 

दरातांडा येथील हातपंपाला पाणी चांगले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून या हातंपंपावर वीजपंप बसवून शंभर मीटर पाइपलाइन करण्यात येणार आहे. हातपंपाचे पाणी पाण्याच्या टाकीत टाकून तांडावासीयांना पुरवठा केला जाईल. 
- आर. सी. पाटील, सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, चाळीसगाव.

Web Title: Dhule news water problem in dartanda