जैताणेतील 18 वर्षीय युवकाची आयटीआय प्रवेशाच्या दिवशीच एक्झिट

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पाच दिवसांपूर्वीपर्यंत सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा, मनमिळाऊ विक्की भविष्याची स्वप्ने रंगवीत होता. येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातून नुकताच विज्ञान शाखेत उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विक्कीला दहावीतही 83 टक्के गुण मिळाले होते.

निजामपूर : जीवनातील तारुण्याच्या उंबरठ्यावर व शैक्षणिक वळणावर आयटीआय प्रवेशाच्या दिवशीच जैताणे(ता.साक्री) येथील चावडी चौकात राहणाऱ्या विक्की जीभाऊ जाधव (वय- 18) या युवकाने आज जगाचा निरोप घेतल्याने जाधव परिवारासह संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास विक्कीवर जैताणेतील स्मशानभूमीत साश्रु नयनांनी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. 

पाच दिवसांपूर्वीपर्यंत सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा, मनमिळाऊ विक्की भविष्याची स्वप्ने रंगवीत होता. येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातून नुकताच विज्ञान शाखेत उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विक्कीला दहावीतही 83 टक्के गुण मिळाले होते. दहावीच्या पात्रतेवर त्याने आयटीआयसाठी अर्जही भरलेला होता. विशेष म्हणजे आयटीआय इलेक्ट्रिशियन शाखेसाठी त्याची गुणवत्तेनुसार धुळे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडही झाली होती. त्याचा वसतिगृहातील प्रवेशही निश्चित झाला होता. आज धुळे येथे प्रवेशप्रक्रियेसाठी त्याला मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चितीसाठी बोलाविण्यात आले होते. पण त्याच धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयातून त्याचा मृतदेह घरी परत आणायची वेळ त्याच्या पालकांवर आली.

पाच दिवसांपूर्वी विक्की आपल्या मित्रांसोबत गावातीलच एका विहिरीवर व नाल्यावर पोहण्यासाठी गेला होता अशी ग्रामस्थांत चर्चा होती. पण त्यांनतर अचानक त्याची तब्बेत बिघडल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला साक्री येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला त्याच्या पालकांनी धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथेही तीन दिवस त्याच्यावर उपचार केले. परंतु त्यात यश आले नाही. अखेर आज सकाळी नऊच्या दरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला. विक्कीला दूषित पाण्यामुळे न्यूमोनिया, टायफॉईड, मलेरिया व कावीळ असे दुहेरी-तिहेरी आजार झाल्याचे त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तर काहींनी डेंग्यूची शक्यता वर्तविली. विक्कीचे वडील जीभाऊ बळीराम जाधव व आई रत्नाबाई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. घरात वृद्ध आजी व लहान भाऊ आहे. विक्कीचा कोणत्याही प्रकारचा जीवनविमा काढलेला नसल्याने त्याच्या गरीब पालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सदा महाजन यांनी केली आहे.

Web Title: Dhule news youth dead