युवकाची नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील इंदवे (ता. साक्री) येथील रहिवासी परमेश्वर सुका वाघ (वय-32) याने सोमवारी (ता. 22) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील इंदवे (ता. साक्री) येथील रहिवासी परमेश्वर सुका वाघ (वय-32) याने सोमवारी (ता. 22) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती कळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार राजाराम बहिरम आदींनी त्वरित घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. त्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराने मृतदेह जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. देसले यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शांताराम तुकाराम वाघ (रा. इंदवे) यांनी दिलेल्या खबरीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजाराम बहिरम घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

नैराश्यातून आत्महत्या
संबंधित युवक हा बेरोजगार होता. त्याच्या वडिलांचेही निधन झाले असून, शेतजमीन वगैरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने त्याचा विवाह जमण्यातही अडचणी येत होत्या. त्यामुळे तो दारुच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. शेवटी नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळी उशिरा मयतावर इंदवे येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.

शवविच्छेदनास पाच तास उशीर
जैताणे आरोग्य केंद्रातील शवविच्छेदनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असूनही सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास आरोग्य केंद्रात दाखल झालेला मृतदेह तब्बल पाच तासांनी म्हणजे दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. असा आरोप अविनाश देवरे (रा.इंदवे) यांनी केला. जैताणे आरोग्य केंद्राला माळमाथा परिसरातील अनेक गावे जोडलेली असूनही शवविच्छेदनाला नेहमीच अडचण येते. येथील शवविच्छेदन गृहातील स्वीपरचे पद गेले अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे साक्रीहून कर्मचाऱ्याला पाचारण करावे लागते. तोपर्यंत बराचसा वेळ जातो. येथे आखाडे (ता.साक्री) येथील प्रमोद ठाकरे नामक युवक गेली अनेक वर्षे रोजंदारी व अल्पशा मानधनावर स्वीपरचे काम करीत आहे. त्याचीही पूर्णवेळ नियुक्ती आरोग्य विभागाने केलेली नाही. त्यामुळे माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी या असुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: dhule news youth suicide in indwe