धुळे तालुक्यात पावसाअभावी पिके लागली करपायला

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटलेत. पावसाची चिन्हे नाहीत. सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचाही फटका पिकांना बसत आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामे करावेत. लोकप्रतिनिधींनी यासाठी आग्रह धरावा. सत्य परीस्थिती लक्षात आणून द्यावी.

राजा पाटील, युवा शेतकरी, कापडणे

कापडणे (ता.धुळे) : धुळे तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. पावसाचा अधुनमधून होणारा शिडकाव्याने पिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. पिकांची स्थिती नाजूक झालेली आहे. बर्‍याचशा ठिकाणी पिके करपायला लागली आहेत. आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकं स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. सुमारे तीन लाख हेक्टरला फटका बसणार आहे. ऐन मोक्याच्या क्षणी पाऊस नसल्याने उत्पादनावरही परीणाम होणार आहे.

कडधान्य हातून गेले
 

मुग, उडीद व चवळी हे कडधान्य साधारणतः दोन महिन्यांत यायला सुरवात होते. पेरण्या उशिरा झाल्यात. आता कडधान्याचा शेंगाधारण होऊन पक्व होण्याच्या  कालावधीतच पावसाने हुलकावणी दिली आहे. सद्यस्थितीत पाऊस आल्यानंतरही नुकसान भरून निघणार नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पावसाची नितांत आवश्यकता

बाजरी, ज्वारी या 80 ते 90 दिवसांच्या पिकांसह, भूईमूग, मका व कापसाची स्थिती भयावह होत चालली आहे. तृणधान्य व गळीतधान्यासाठी पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

दडी मारलेल्या पावसाची गावागावांत आळवणु सुरु झाली आहे.

खरीपाचे क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : 
कपाशीची लागवड 215349 हेक्टर
तृणधान्य 98093
गळीत धान्य 32606
कडधान्य 23387

Web Title: Dhule Taluka Rain remain for Crops