धुळ्याचा पाणीपुरवठा सुरू - कमलेश देवरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

धुळे - थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच मंगळवारी (ता. ५) सायंकाळी खंडित केला होता. एकूण तीन कोटी आठ लाखांच्या थकीत रकमेपैकी ४३ लाखांचा धनादेश आज पाटबंधारे विभागास दिल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती सभागृह नेते कमलेश देवरे यांनी आज दिली. 

धुळे - थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच मंगळवारी (ता. ५) सायंकाळी खंडित केला होता. एकूण तीन कोटी आठ लाखांच्या थकीत रकमेपैकी ४३ लाखांचा धनादेश आज पाटबंधारे विभागास दिल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती सभागृह नेते कमलेश देवरे यांनी आज दिली. 

शहराला नकाणे तलाव, तापी नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हे जलस्रोत पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टी भरून शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. जकात, पारगमन शुल्क, एलबीटी यासारखे प्रमुख आर्थिक स्रोत बंद झाल्याने महापालिकेला आर्थिक टंचाईशी सामना करावा लागत आहे. परिणामी, थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा डोंगर वाढत चालला आहे. नकाणे तलावाशी निगडित दोन कोटी ९ लाख ५५ हजार, तर तापी नदीशी निगडित ९७ लाख ७९ हजार, असे एकूण तीन कोटी सात लाख ४४ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. ती वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने शहराला या जलस्त्रोतांवरून होणारा पाणीपुरवठा खंडित केला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेत पंधरा कोटींचा मालमत्ता, पाणीपट्टी कर वसूल झाल्याने पाटबंधारे विभागाने ही संधी साधत थकीत पाणीपट्टीची मागणी केली. 

पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर शहरातून ओरड सुरू झाली. त्याची महापौर कल्पना महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते कमलेश देवरे यांनी दखल घेतली. श्री. देवरे, उपायुक्त रवींद्र जाधव, अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण यांनी पाटबंधारे विभागाकडे धाव घेतली. कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, सहाय्यक कार्यकारी अभियंता नागेश वट्टे, उपविभागीय अभियंता बेहरे यांच्याशी चर्चा करत एकूण थकीत रकमेपैकी ४३ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. मात्र, संपूर्ण थकीत रक्कम भरल्याशिवाय शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणार नाही, अशी ताठर भूमिका पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांना स्थितीची जाणीव करून दिल्यानंतर ते नरमले आणि त्यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करीत असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर महापालिकेचे पथक माघारी फिरले, अशी माहिती श्री. देवरे यांनी दिली.  

वसुलीसाठी ‘नॉट रिचेबल’
महापालिकेकडून संपूर्ण थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्यावर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मोबाईल ‘स्वीच ऑफ’ केला आणि ते वरिष्ठ पातळीवरील बैठकीसाठी रवाना झाले. त्यांच्या आदेशाशिवाय महापालिकेचा ४३ लाखांचा धनादेश स्वीकारणार नाही आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणार नाही, अशी ताठर भूमिका विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. श्री. देवरे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला पाणीप्रश्‍नी निर्माण होऊ शकणाऱ्या स्थितीची जाणीव करून दिल्यानंतर पाटबंधारे विभागाने धनादेश स्वीकारला.

Web Title: dhule water supply start