पदविका अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नाशिक  - इयत्ता दहावीनंतर तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअरचा पर्याय असलेल्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. गुरुवार (ता. 21) पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑगस्टअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया चालणार आहे. नाशिक विभागात 89 तंत्रनिकेतनांत (पॉलिटेक्‍निक) 31 हजार 630 जागा उपलब्ध आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा होती. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर झाले आहे; परंतु अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणाची अट पदविकेसाठीही घालण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत जाहीर वेळापत्रकात जातवैधता प्रमाणपत्र स्वीकृतीची मुदत 16 जुलै नमूद केली आहे. हरकती नोंदविण्याची प्रक्रिया झाल्यानंतर जातवैधता सादरीकरणाची अंतिम मुदत 20 जुलै असल्याचा उल्लेख वेळापत्रकात केला आहे. प्रमाणपत्र सादरीकरणाच्या दोन तारखा असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: Diploma Courses time table declare