आदिवासींच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून साडेदहा लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

नाशिक - आदिवासी विकासचे बनावट संकेतस्थळ तयार करीत शिक्षकभरतीचे आमिष दाखवत साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणात टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता असून, अद्याप सहा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता, 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

नाशिक - आदिवासी विकासचे बनावट संकेतस्थळ तयार करीत शिक्षकभरतीचे आमिष दाखवत साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणात टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता असून, अद्याप सहा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता, 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

संदीप कौतिक पाटील (रा. पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आदिवासी विकास भवनच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार केली. संकेतस्थळावर आदिवासी विभागाचे शासकीय चिन्ह वापरत युवकांना गंडविण्याचे काम सुरू होते. संशयित सचिन परदेशी, पप्पू ऊर्फ सुरेश पाटील, भालेराव, अमित लोखंडे, पठाण, आधार बाविस्कर, केतन पाटील, तुकाराम पवार, हेमंत पाटील या संशयितांनी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी संदीप पाटील यास आमिष दाखवून 17 लाख रुपयांची मागणी केली. संदीप पाटील याने 7 एप्रिल 2016 ते 1 जानेवारी 2017 दरम्यान आदिवासी विकास भवनात संशयितांची भेट घेऊन दहा लाख 50 हजार रुपये दिले; तर उर्वरित सहा लाख 50 हजार रुपये मिळविण्यासाठी संशयितांनी आदिवासी विकास भवनचे बनावट नियुक्तिपत्र तयार केले. त्यावर अप्पर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून ते नियुक्तिपत्र खरे असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न केला. यासंदर्भात संदीप पाटील याने संशयित हेमंत पाटील याच्याकडे बनावट नियुक्तिपत्र असल्याचे सांगताच त्याने जीवे ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच मुंबई नाका पोलिसांत संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत सीताराम पाटील (वय 31, रा. गवळेनगर, देवपूर, धुळे), सुरेश गोकुळ पाटील (34, रा. तुळशीरामनगर, देवपूर, धुळे), तुकाराम रामसिंग पवार (56, रा. तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव), उदयनाथ श्‍यामनाथ सिंग (30, रा. भाईंदर) या चौघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने येत्या 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

या प्रकरणात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळीच सक्रिय असण्याची शक्‍यता असून, पोलिस सहा संशयितांच्या मागावर आहेत. यात आदिवासी विकास भवनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही संबंध आहे काय, याचाही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Discipleship through tribal fake website