जिल्हा परिषदेने दिला जिल्हा बॅंकेला दणका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नाशिक - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत निर्माण झालेला रोखता व तरलतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जिल्हा बॅंकेमार्फत होणारे माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांचे वेतन मिळणे, तसेच ठेकेदारांचे धनादेश वटणे कठीण झाले आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांची अडचण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने निवृत्त कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडून आलेली निवृत्तिवेतनाची पाच कोटींची रक्कम दुसऱ्या बॅंकेत वर्ग केली. जिल्हा बॅंकेच्या व्यवहारात सुधारणा झाली नाही, तर भविष्यात इतर निधीबाबतही जिल्हा परिषद अशीच भूमिका घेऊ शकते, असा सूचक इशारा दिला आहे. 

जिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यात जिल्हा बॅंकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून कामकाज सुरळीत करा, अन्यथा खाते बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संदर्भ दिलेले धनादेश वटविण्याचे धोरण बॅंकेने घेतले आहे; परंतु बॅंकेच्या या भूमिकेमुळेही जिल्हा परिषदेचे समाधान होऊ शकलेले नाही कारण त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. याचाच विचार करून जिल्हा परिषदेने निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनापोटी राज्य शासनाकडून आलेले पाच कोटी रुपये दुसऱ्या बॅंकेत जमा केले आहेत. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तिवेतन वेळेवर मिळणे शक्‍य होणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत दहा हजार निवृत्तांचे वेतन दिले जाते. त्यांना निवृत्तिवेतन मिळण्यात जिल्हा बॅंकेकडून उशीर झाल्यास त्याचा नाहक आपल्याला त्रास नको, या भूमिकेतून जिल्हा परिषदेने ही कृती केली आहे. भविष्यात जिल्हा बॅंकेची स्थिती अशीच राहिल्यास इतर निधीही अशाच पद्धतीने इतर बॅंकांत जमा केला जाणार असल्याचे समजते. 

माध्यमिक शिक्षकांचे आज आंदोलन 
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या आश्‍वासनानंतरही माध्यमिक शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यामुळे परिस्थितीत काही बदल झाला नाही. यामुळे मुख्याध्यापक संघातर्फे उद्या (ता. 18) जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर सर्व माध्यमिक शिक्षकांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. यामुळे सकाळी अकराला जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे एस. बी. देशमुख यांनी कळविले आहे. 

Web Title: District Bank bump