जिल्हा काँग्रेसला अस्तित्वाच्या बळाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

जळगाव - स्वातंत्र्यपूर्वकाळात काँग्रेसचे अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे आयोजित केले होते. ‘फैजपूर काँग्रेस’ म्हणून आजही इतिहासात त्याची नोंद आहे. त्याच जळगाव जिल्ह्यात काँग्रेस आज राजकीय नकाशावर शून्य होत आहे. पक्षस्थापनेच्या १३१ व्या वर्धापनदिनी काँग्रेस जिल्ह्यात आपल्या नवीन रणनीतीची आखणी करून जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवून राजकीय अस्तित्वाचे बळ शोधणार आहे.

जळगाव - स्वातंत्र्यपूर्वकाळात काँग्रेसचे अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे आयोजित केले होते. ‘फैजपूर काँग्रेस’ म्हणून आजही इतिहासात त्याची नोंद आहे. त्याच जळगाव जिल्ह्यात काँग्रेस आज राजकीय नकाशावर शून्य होत आहे. पक्षस्थापनेच्या १३१ व्या वर्धापनदिनी काँग्रेस जिल्ह्यात आपल्या नवीन रणनीतीची आखणी करून जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवून राजकीय अस्तित्वाचे बळ शोधणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. सहकारासह सर्वच ठिकाणी काँग्रेसचे बळ भक्कम होते.  त्यामुळेच एकेकाळी काँग्रेस सरकारच्या काळात जिल्ह्यातील तीन मंत्री होते. विरोधकांना शिरकाव करण्यासही जागा नव्हती. कालांतराने पक्षांतर्गत वाद सुरू झाले, विरोधकांनीही त्याचा फायदा घेत आपले बळ वाढविले. त्यामुळे आजच्या स्थितीत जिल्ह्यात काँग्रेस सत्ता नव्हे, तर पक्षाचा एकही आमदार नाही. जळगाव महापालिकेतही पक्षाचा नगरसेवक नाही. जिल्हा परिषदेत केवळ दहा सदस्य आहेत.

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतही पक्षाला फारसे यश मिळू शकले नाही. त्यामुळे आगामी काळात राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना मोठे श्रम करावे लागणार आहेत. 

उद्या स्थापनादिन
काँग्रेस स्थापनेला बुधवारी (२८ डिसेंबर)  १३१ वर्षे पूर्ण होत आहेत. जळगाव जिल्ह्यात फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने काँगेसला वेगळा इतिहास आहे. त्यामुळे पक्षातर्फे बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे याचे औचित्य साधून पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकही आयोजित केली आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे राजकीय बळ कमी झाले आहे, याचा अर्थ जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा आपले अस्तित्व मिळविणार नाही असा नाही. आजही रावेर, यावल, चोपडा, पाचोरा  या भागात काँग्रेस टिकाव आहे. त्या िंठकाणी केवळ कार्यकर्त्यानी बळ देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

बैठकीचे आयोजन
१३१ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी निवडणुकीच्या तयारीची बैठकच पक्षातर्फे आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे निरीक्षक विनायक देशमुख व हेमलता पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर पक्षाचे जिल्हा प्रभारी भाई जगतापही उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी पारंपरिकता झुगारून नावीन्यतेकडे जाण्यासाठी पक्षाने नियोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच या बैठकीत विचार करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व आहे. त्याकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील स्वतः ही बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या आखणीत तरी काँग्रेसला यश मिळेल काय, हेच पाहणे गरजेचे आहे. 

काँग्रेसच्या स्थापनेला  १३१ वर्षे पूर्ण होत आहेत. खरोखरच ही अभिमानाची बाब आहे. त्याचे औचित्य साधूनच ही पक्षाची जिल्हा बैठक आयोजित केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात रणनीतीबाबत आखणी होईल. 
- ॲड. संदीप पाटील, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस, जळगाव

Web Title: District Congress wait for the existence of force