निजामपूर-जैताणेत पिसाळलेल्या कुत्रीचा उच्छाद, दहा ते बारा जण जखमी

प्रा.भगवान जगदाळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणेत बेवारस, मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून आबालवृद्धांसह ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही कुत्रे तर अक्षरशः सायकल, मोटारसायकल व चार चाकी वाहनांचाही पाठलाग करतात. स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे

निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही गावांत मंगळवारी सकाळपासूनच एका पिसाळलेल्या कुत्रीने थैमान घातले होते. तिने सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यापैकी दोन बालकांच्या शरीरावरील लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. एकावर जैताणे आरोग्य केंद्रात तर दुसऱ्यावर खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ खूपच भयभीत झाले आहेत.

इयत्ता तिसरीत शिकणारा दिगंबर गुलाब सूर्यवंशी (जैताणे, वय-8) व अयान अजीत मदारी (निजामपूर, वय-5) अशी गंभीर जखमी बालकांची नावे असून सकाळी नऊच्या सुमारास एकास क्लासला जाताना तर दुसऱ्याला अंगणात खेळताना पिसाळलेल्या कुत्रीने चावा घेतला. प्रथमोपचारानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांचा रक्तस्राव थांबत नव्हता. अशी माहिती जखमी अयानचे काका नुरा बाबूभाई मदारी यांनी दिली. जखमी अयान हा निजामपूर येथील सर्पमित्र कासमभाई मदारी व बाबूभाई मदारी यांचा नातू आहे. तर गंभीर जखमी झालेला दिगंबर हा जैताणेतील शेतकरी बापू रुपचंद सूर्यवंशी यांचा नातू व गुलाब बापू सूर्यवंशी यांचा मुलगा आहे. जैताणे आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सोय नसल्याने जखमी दिगंबरला अक्षरशः मोटारसायकलने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अशी संतापजनक माहिती सामाजिक कार्यकर्ते सदा महाजन यांनी दिली व आरोग्य केंद्रातील असुविधेबद्दल तीव्र नापसंती व रोष व्यक्त केला. दोन्ही गावे एवढी मोठी असूनही जर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत शरमेची बाब आहे असेही ते म्हणाले.!

त्या व्यतिरिक्त आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतलेल्या अन्य जखमींची नावे याप्रमाणे : अमन बशीर तांबोळी (निजामपूर, वय-11), खुशी योगेश्वर मोरे (जैताणे, वय-5), शेख अली मोहम्मद अली (निजामपूर, वय-9), आकाश मोहन सोनवणे (जैताणे, वय-3), मुस्कान अहमद तांबोळी (निजामपूर, वय-16), जुनेदखान आबिदखान (निजामपूर, वय-35), पिंकी मुन्ना भलकारे (जैताणे, वय-8).
त्यापैकी काहींना साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना नंदुरबार व धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात करण्यात आले आहे. काही जखमींनी खाजगी दवाखान्यातच परस्पर उपचार घेतल्याचेही सांगण्यात आले. साधारणतः दहा ते बारा जणांना पिसाळलेल्या कुत्रीने चावा घेतल्याने, दोन्ही गावांतील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

याबाबत नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत व खासदार डॉ. हिना गावीत यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून संबंधित रूग्णांवर विशेष उपचार करणेबाबतचा आदेश दिल्याची माहिती भाजपचे कार्यकर्ते डॉ. प्रतीक देवरे (साक्री) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. संबंधित जखमींची प्रकृती सद्या स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

उपाययोजनेची गरज...
निजामपूर-जैताणेत बेवारस, मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून आबालवृद्धांसह ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही कुत्रे तर अक्षरशः सायकल, मोटारसायकल व चार चाकी वाहनांचाही पाठलाग करतात. स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींनी कोंडवाडे कार्यान्वित करून मोकाट गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवरही दंडात्मक कारवाई केली पाहिजे. अशीही मागणी होत आहे.!!

अखेर त्या पिसाळलेल्या कुत्रीचा जीवघेणा खेळ खल्लास.!
सुमारे दहा-बारा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी करणाऱ्या पिसाळलेल्या कुत्रीचा "जीवघेणा खेळ" निजामपूर-जैताणेतील काही तरुणांनी मंगळवारी (ता.23) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास संपविला. बसस्थानकाजवळील एका शो-रुमशेजारी सुमारे १५-२० युवकांनी अखेर तिचा हा खेळ संपविला. त्या युवकांमध्ये दर्शन परदेशी, भूषण पगारे, युसूफ पठाण, शोएब तांबोळी, सोहेल सय्यद, अमजद मिर्झा, साहिल सय्यद, साहिल तांबोळी, अमजद मदारी, सलीम मदारी, जुनेद पठाण, आफताब मिर्झा, नुरा मदारी, अर्शद पठाण, फारुख पठाण, माजिद मदारी आदींचा समावेश आहे. ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडत त्या युवकांचे मनापासून आभार मानले आहेत.!!

Web Title: dog dhule north maharashtra