डॉ. हेमलता पाटील यांना ठार करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक - प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्‍त्या व महापालिकेच्या प्रभाग पश्‍चिम समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी नंदिनी नदीपात्रातील होर्डिंगच्या विषयात लक्ष घालू नये, असा त्यांना निनावी पत्राद्वारे इशारा देत ठार करण्याची धमकी दिली आहे. डॉ. पाटील यांनी यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली असून, पत्राच्या आधारे चौकशी सुरू आहे.

नंदिनी नदी स्वच्छतेसाठी डॉ. पाटील यांनी पुढाकार घेतला. स्थानिकांसोबत आंदोलनाबरोबरच स्वच्छता मोहीम व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. शनिवारी (ता. ७) नदीपात्रात आठ फूट उंचीचे काँक्रिटचे खांब उभे राहत असल्याने पुराला अडथळा निर्माण होईल म्हणून स्थानिकांनी ही बाब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेत होर्डिंग काढण्याची मागणी त्यांनी केली होती. पाटबंधारे विभागाने स्थानिक पातळीवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले, तर महापालिकेनेही नदीतील होर्डिंग हटविण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाचा असल्याचे सांगितले. नदीपात्रात बांधकामाला बंदीचे उच्च न्यायालयाने मार्च २०१७ मध्ये आदेश दिले आहेत.

त्याचेही कागदपत्रे पाटबंधारे विभाग व महापालिकेकडे दिल्यानंतर नदीपात्रातील होर्डिंग काढण्यास सुरवात झाली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे पत्र ९ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना रजिस्टर्ड पोस्टाने पाठविल्याचे सांगताना गुरुवारी सकाळी रजिस्टर्ड पोस्टाने एक पत्र प्राप्त झाले. त्यात नदीपात्रातील होर्डिंगचा पाठपुरावा करू नका; अन्यथा जिवाला धोका असल्याचा मजकूर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Web Title: dr. hemalata patil murder warning crime