शिस्तप्रिय मुंढेंच्या नाशिकमध्ये 25 दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर 

राजेंद्र बच्छाव
मंगळवार, 15 मे 2018

एकीकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे "सोयी हव्या असतील तर करवाढ सहन करावी लागेल", असे ठाम पणे नागरिकांना सांगतात तर दुसरीकडे मात्र आहेत त्या ड्रेनेजच्या सुविधांच्या देखभालीला 25 दिवसांपासून टोलवा टोलवा सुरु आहे. प्रभाग 30 मधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या शिवकॅालनीचसमोरील रस्त्यावर ड्रेनेजच्या चेंबर्स मधून वाहत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील नगरसेवक अॅड़. श्याम बडोदे हे प्रकरण थेट आयुक्तांच्या दरबारी नेणार आहेत. 

इंदिरानगर : एकीकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे "सोयी हव्या असतील तर करवाढ सहन करावी लागेल", असे ठाम पणे नागरिकांना सांगतात तर दुसरीकडे मात्र आहेत त्या ड्रेनेजच्या सुविधांच्या देखभालीला 25 दिवसांपासून टोलवा टोलवा सुरु आहे. प्रभाग 30 मधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या शिवकॅालनीचसमोरील रस्त्यावर ड्रेनेजच्या चेंबर्स मधून वाहत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील नगरसेवक अॅड़. श्याम बडोदे हे प्रकरण थेट आयुक्तांच्या दरबारी नेणार आहेत. 

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या भागात असणाऱ्या पावसाळी नाल्यात असणारे ड्रेनेजचे पाइप तुटले आणि या नाल्यातून दुर्गंधी युक्त सांडपाणी वाहू लागले. पाण्याला अटकाव म्हणून नाल्यातच या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंधारे बांधून हे वाहते पाणी थांबवले. मात्र हे तुंबलेले पाणी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उलटे गेल्याने चेंबर्स देखील गच्च झाले. चेंबर्स मोकळे करण्याचा अजब फंडा या कर्मचाऱ्यांनी शोधला. चेंबर्स फोडून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर, मोकळ्या भूखंडांवर, परिसरातील बंगल्याच्या आवारात मुक्तपणे वाहत आहे.

नागरिकांनी याबाबत स्थानिक नगरसेवक बडोदे यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी संबंधित कर्मचऱ्यांना याची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी लक्ष दिले नाही मात्र गेल्या आठवड्यात बडोदे यांनी जातीने लक्ष दिल्यावर काही कर्मचारी आणि अधिकारी तेथे आले. दुपारपर्यंत पर्यायी काम सुरू करतो असे सांगुन परत गेले. मात्र काम सुरूच केले नाही. 

आता नागरिकांचा सहनशीलतेचा अंत झाला आहे. एकीकडे भरमसाट कर वाढ होत असताना आहे त्या सुविधांच्या दुरुस्तीसाठी जर एक महिना थांबावे लागत असेल तर या कैफीयती बाबत काय करावे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

"पंचवीस दिवस सातत्याने पाठपुरावा करून देखील ना अधिकारी ना कर्मचारी ही बाब मनावर घेत नाही हे बघून संताप होत आहे. इतक्या दिवसांपासून वाहणाऱ्या दुर्गंधी पाण्यामुळे परिसरातून चालतांना अक्षरशा नाक दाबून जावे लागत आहे. याबाबत आता थेट आयुक्तांकडे तक्रार करणार असून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशी मागणी करणार आहे, असे नगरसेवक अॅड .शाम बडोदे यांनी सांगितले.

Web Title: drainage water flow on the road in nashik from 25 days