आयुषच्या चित्रांची निवड 'अ सिंफनी इन वॉटर कलर' या दर्शनात निवड

राजेंद्र बच्छाव
शनिवार, 12 मे 2018

नाशिक : नाशिकमधील अवघ्या 15 वर्षांच्या आयुष वाळेकर याच्या चित्राची कॅनडा येथील इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीतर्फे 28 सप्टेंबर 2018 पासून तेथे भरवण्यात येणाऱ्या 'अ सिंफनी इन वॉटर कलर' या चित्रप्रदर्शनात निवड करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिकमधील अवघ्या 15 वर्षांच्या आयुष वाळेकर याच्या चित्राची कॅनडा येथील इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीतर्फे 28 सप्टेंबर 2018 पासून तेथे भरवण्यात येणाऱ्या 'अ सिंफनी इन वॉटर कलर' या चित्रप्रदर्शनात निवड करण्यात आली आहे.

जगभरातील 32 देशातील 320 चित्रकारांनी पाठवलेल्या चित्रांमधून अंतिम प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या अवघ्या 60 चित्रात आयुषच्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. जून 2015 ला रेस अॅक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम या खडतर सायकल शर्यत जिंकणारे पहिले भारतीय ठरणारे नाशिकचेच डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन बंधूंनी स्पर्धा जिंकल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना दर्शवणाऱ्या छायाचित्राला आयुषने चित्र रुपात चितारले होते. त्याच्या याच कलाकृतीची या प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

या संस्थेने त्याला या प्रदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. एवढ्या कमी वयात हा मान मिळवणारा कदाचित तो जगभरातील मोजक्या चित्रकारांपैकी एक असेल अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. सिल्वर ओक शाळेत 6 वी आणि 7 वीत असतानाच त्याने शासनाच्या चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा अ श्रेणीत पास केल्या आणि व्यवसायाने ग्राफिक्स आर्टिस्ट असलेले वडील मिलिंद यांनी त्याला या क्षेत्राचा करिअर करू देण्याचा निर्णय घेतला.

सध्या तो मविप्र संस्थेच्या के टी एच एम् महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकत आहे. अमेरिकास्थित प्रा.विलास टोणपे आणि नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश आणि प्रफुल्ल सावंत बंधू यांच्या मार्गदर्शनाच त्याला मोठा फायदा होत आहे .2017 च्या महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची विविध चित्रे असलेले कॅलेंडर तयार केले होते. त्यातील बाळासाहेबांचे सर्व चित्रे आयुषने काढली होती .या कॅलेंडरचे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यातील चित्रे बघून ठाकरे यांनी आयुषचा चक्क ऑटोग्राफ घेतला होता आणि त्याला मातोश्रीवर खास भेटीसाठी आमंत्रित केले होते.

आतापर्यंत त्याने नांदुरमधमेश्वर, सातारा, वाराणसी आदि ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऑन दी स्पॉट चित्रकला स्पर्धेत विविध बक्षिसे मिळविली आहेत. एवढ्या कमी वयात त्याच्या चित्रकलेतील असलेल्या गतीमुळे अनेक चित्रकार देखील स्तंभित होत आहेत .आई निवेदिता त्याला विविध स्पर्धांसाठी सातत्याने सोबत करीत आहेत . लहान भाऊ आर्यन हा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत या विषयातच करिअर करणार आहे. त्याच्या चित्राची जगभरातल्या या मोठ्या प्रदर्शनात निवड झाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

एवढय़ा मोठ्या चित्र प्रदर्शनात माझ्या चित्राची निवड होईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नाशिक शहराला चित्रकारांची मोठी परंपरा आहे या परंपरेचा एक हिस्सा म्हणून माझी वाटचाल सुरू ठेवत शहराचे आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर माझ्या कलेच्या माध्यमातून पोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे आयुष वाळेकर याने सांगितले.       

लहानपणीच नातेवाईक आणि इतर अनेकांचा विरोध डावलून आयुषला चित्रकलेतच करिअर करू देण्याचा माझा निर्णय आज सफल होत असल्याचे बघून समाधान वाटत आहे. शहरातील चित्रकार सावंत बंधू आणि टोनपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला या क्षेत्रात हव्या असलेल्या प्रत्येक संधी मिळवून देण्याचा पालक म्हणून मी प्रयत्न करणार आहे, आयुषचे वडिल मिलिंद वाळेकर यांनी सांगितले.  

Web Title: drawings of ayush selected in a symphony in water color exhibition