पन्नास देशी गाय सांभाळणाऱ्या कुटुंबाची व्यथा

अमोल खरे
शनिवार, 11 मे 2019

नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, नुसताच शुकशुकाट, एखादेच चुकार वासरू, कुठेतरी उद्ध्वस्त घाट ..!  कविवर्य ना धो महानोरांच्या या काव्य ओळी चटकन ओठावर याव्या आशा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नांदगाव तालुक्याची अवकळा बिकट झाली आहे. पाऊसपाणी नसल्याने दुष्काळाचा दाह अधिक जाणवू लागला आहे. माणसं वडून ताडून पाणी आणतील पण जनावरांनी करायचं काय, रणरणते उन्ह, उघडे बोडके झालेले डोंगर माळरान जनावर वळण्याऐवजी सोडून द्यावी लागत आहे.

मनमाड : दुसकाळानं पार कंबरडं मोडलं .. प्यायला पाणी न्हाय की जित्राबांना चारा न्हाय .. हवा खात खुर्चीत बसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना काय कळणार आमच्या मरणकळा अन् दुसकाळाचा चटका .. चारा पाणीच नाय, सांगा .. कशी जगवायची आमची जित्राब, बायकोच्या अंगावरचा डाग मोडला .. पोरीचं लगन पुढं ढकललं पण जित्राब जगवली आता नाय हिम्मत .. पोरावाणी सांभाळलेली जनावर कशी सोडून देऊ रानोमाळी अन कशी बांधू खाटकाच्या दारात नेऊन ..शासनाच्या मदतीची वाट पाहत असलेला हा आर्त स्वर आहे. निवडणुकीच्या धामधुमीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या रद्द झालेल्या दुष्काळ दौऱ्यातील (ता. नांदगाव) हिसवळ बुद्रुकच्या पन्नास देशी गाय सांभाळणाऱ्या भय्यासाहेब देशमुख या शेतकरी कुटुंबाचा!

नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, नुसताच शुकशुकाट, एखादेच चुकार वासरू, कुठेतरी उद्ध्वस्त घाट ..!  कविवर्य ना धो महानोरांच्या या काव्य ओळी चटकन ओठावर याव्या आशा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नांदगाव तालुक्याची अवकळा बिकट झाली आहे. पाऊसपाणी नसल्याने दुष्काळाचा दाह अधिक जाणवू लागला आहे. माणसं वडून ताडून पाणी आणतील पण जनावरांनी करायचं काय, रणरणते उन्ह, उघडे बोडके झालेले डोंगर माळरान जनावर वळण्याऐवजी सोडून द्यावी लागत आहे. अशात शासकीय यंत्रणा कायद्याच्या कचाट्याचा, आदेशाचा आणि आचारसंहितेचा बागुलबुवा करून काथ्याकूट करत चारा डेपो, छावण्या देण्यास टाळाटाळ करत असल्याचे विदारक चित्र आहे पालकमंत्री गिरीश महाजन आमच्या गावात दुष्काळ दौऱ्यासाठी येणार म्हणून हिसवळ बुद्रुकच्या भय्यासाहेब देशमुख या शेतकऱ्यासह ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्याला कारणही तसेच होते.

दुष्काळात जनावरे सोडा माणसं जगवनही मोठं मुश्कील असत. मात्र भय्यासाहेब देशमुख यांनी पन्नासच्या वर देशी गायी पाळल्या आहे. ते सांगतात जोपर्यंत चारापाणी होता तोपर्यंत गायी सांभाळल्या ते पुढे बोलू लागले की दुष्काळाच्या झळा त्यांच्या डोळ्यातून आणि बोलण्यातून स्पष्ट जाणवत होत्या मार्च, एप्रिल, मे महिना जीवघेणा झाला. विहिरींना पाणी राहिले नाही जवळचा चारा संपला, गायी वळायला न्याव्या कुठं जिकडे जा तिकडे रणरणते उन्ह गवत राहिले नाही जमिनी ओस पडल्या झाडाझुडपांना पाला राहिला नाही डोंगर उघडे बोडके झाले काही गायांना वासर आहे. पण त्यांना दूध नाही जनावरांची हाडं वर निघाली जवळ पैसे होते तोपर्यंत विकतचा चारा पाणी दिला कर्ज घेतलं तेही संपले सांगा डोळ्यादेखत गायी मरू देता येईल का म्हणून बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडलं आलेल्या पैशातून काही दिवस ढकलले पण पुन्हा ग्रहण लागावं तस डोक्यातील विचार झोपू देईना गायीचा विचार तसा घरात उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचा विचार, पण जनावरांच्या पायी मुलीच लग्न पुढं ढकललं लग्नाला ठेवलेला पैसा आडकाही मोडला, जित्राब जगवतो आहे दोन दिवसाला एक पाण्याचा टँकर लागतो तर आठ दिवसाला चाऱ्याची एक ट्रॉली लागते सातशे रुपयांचा एक टँकर आणि चार हजार रुपयांची एक चाऱ्याची ट्रॉली धरली तर महिन्याला ३० हजार खर्च येतो दुष्काळाची हीच स्थिती तालुक्यात आहे. 

डिसेंबर महिन्यात भय्यासाहेब देशमुख यांनी नांदगावच्या तहसीलदारांना निवेदन देवून चारापाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. ग्रामसभेत देखील ठराव पास करून गावातील जनावरांना चारापाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे मात्र चार महिन्याचा कालावधी उलटल्या नंतरही तहसील कार्यालयाकडून कोणतीही उपयायोजना करण्यात आली नाही मदत मिळावी म्हणून भय्यासाहेबांनी चार महिन्या पासून शासकीय कार्यालयांच्या खेट्या मारत आहे. पशुधन वाचावं म्हणून हा शेतकरी धडपड करत आहे. अपुरा चारापाणी मिळत असल्याने जनावरे मरणाअवस्थेत पोहचली आहे. या परिस्थितीची त्यांनी वारंवार कल्पना देवून देखील शासकीय यंत्रणेला मात्र माणुसकीचा पाझर फुटत नसल्याचे पाहून सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदगाव तालुक्याला भेट देवून दुष्काळाची पाहणी केली या दौऱ्यात ते हिसवळ बुद्रुकला देखील भेट देणार होते, त्यामुळे देशमुखसह ग्रामस्थांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था होईल असे सर्वाना वाटत होते मात्र उशीर झाल्यामुळे ना. महाजन यांनी हिसवळला भेट दिली नाही त्यामुळे ग्रामस्थांचा हिरमोड झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought affect on cows in Manmad