चारा टंचाईबाबत प्रशासनाची टोलवाटोलवी 

drought
drought

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या चारा टंचाईसंदर्भात प्रशासनाकडून टोलवाटोलव केली जात आहे. तालुक्यात ३ हजार ६०० मेट्रीक टन चारा असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शासनाला वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा व गुरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

तालुक्यातील ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या २०१२ च्या पशुगणनेनुसार १ लाख ६५ हजार ८१९ आहे. सद्यःस्थितीत त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अनेक जण बेरोजगारीवर मात करण्यासाठी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. असे असताना सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत गुरांसाठी चारा मिळणे कठीण झाले आहे. आजच्यासारखी चारा टंचाई कधीच नव्हती. चाऱ्याच्या पेंढीचे भाव सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने अनेकांनी गुरे विक्रीला काढली आहेत. शेतकरी आधीच कर्जबाजारी असून त्यात पाणी व चारा टंचाईमुळे तो बेजार झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणाचे वाटप केले असले तरी पाण्याअभावी चाऱ्याचे उत्पादनच झालेले नाही, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. त्यात दिवसेंदिवस वाढणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळी परिस्थिती, पशुखाद्य तसेच चाऱ्याचे वाढलेले भाव, शासनाच्या योजनांचा न मिळालेला लाभ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

चुकीचा अहवाल दिल्याची तक्रार 
चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामात तालुका कृषी विभागाने चाऱ्यासाठी ९०० किलो बाजरीचे बियाणे रब्बी हंगामात दिले होते. त्याचा जवळपास ३ हजार ६०० मेट्रीक टन चारा उत्पादीत झाल्याची माहिती कृषी विभाग देत आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाकडून चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात ज्वारीव मका यासह इतर बियाणे वाटप केली होते. त्यापासून किती चारा उत्पादीत झाला याची नोंद या विभागाकडे नाही. असे असले तरी प्रत्यक्षात चाऱ्याचे उत्पादन झालेले आहे का? हे देखील पाहणे गरजेचे होते. प्रशासनाने चुकीचा अहवाल दिल्यामुळेच चाळीसगाव तालुक्यात चारा टंचाई नसल्याने शासनाकडून कुठल्याही उपाययोजा केल्या जात नसल्याचा आरोप रयत सेनेने केला आहे. त्यामुळे खरी परिस्थिती लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

शेतकरी म्हणतात...... 

शासनाने चारा उपलब्ध करुन द्यावा 
नाना पाटील (अध्यक्ष ः अन्नदाता शेतीसेवा शेतकरी गट, पिंप्रीखुर्द, ता. चाळीसगाव) ः पशुपालक बांधवांसमोर चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. चारा शोधण्यासाठी त्यांना बाहेरगावी वणवण भटकावे लागते. भटकंती करुनही चारा मिळत नाही, मिळाला तर तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. विकत घेणे परवडत नसल्याने शासनाने चारा उपलब्ध करुन देण्याची सोय करावी. 

प्रशासनाने जबाबदारी पाळावी 
विवेक रणदिवे (देवळी, ता. चाळीसगाव) ः प्रशासन आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहे. सत्य परिस्थिती लपवून खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनाला देत आहे. तालुक्यात चारा टंचाई असताना प्रशासनाने दिलेली माहिती चुकीची असून ती शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. हा प्रकार दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी व मुक्या जनावरांची थट्टा करणारा आहे. 

या दुष्काळात जगावे तरी कसे? 
शिवदास पाटील (चिंचखेडे, ता. चाळीसगाव) ः दुष्काळी परिस्थितीत स्वतःचे पोट भरण्याबरोबर गुरे ढोरे कशी सांभाळावी हा आमच्या समोर मोठा प्रश्न सद्यःस्थितीत निर्माण झाला आहे. अगोदरच दुधाला भाव नाही, त्यातच चारा मिळत नसल्याने जनावरे जगवणे कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com