पोटाला भाकर नको, पिण्यासाठी पाणी द्या 

दीपक कच्छवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

बोअरवेलवाले ठरले जलदूत 
गावात निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता, ज्या ग्रामस्थांनी आपल्या स्वतःसाठी खाजगी बोअरवेल केले आहेत. त्यातील काही जण कुठलाही मोबदला न घेता ग्रामस्थांना पाणी देत आहेत. मात्र, अशांच्या बोअरवेल देखील आता आटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनाच त्यांचे पाणी पुरत नाही. तर काही बोअरवेलधारकांच्या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. मात्र, वीज बिल जास्तीचे येत असल्याच्या कारणामुळे ते भरू देत नाही, असे येथील महिलांनी सांगितले. मात्र, सध्याच्या टंचाईत जे बोअरवेलवाले ग्रामस्थांना पाणी देत आहेत, ते आज गावातील गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘आम्हाला पोटाला भाकर नको पण पिण्यासाठी पाणी द्या’, अशी आर्त मागणी करुन कुंझर (ता. चाळीसगाव) येथील महिलांनी पोटतिडकीने आपली पाण्याची समस्या ‘सकाळ’कडे मांडली. गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी विशेषतः महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत गावात पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांमधून होत आहे. 

चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीवरील शेवटचे गाव असलेल्या कुंझर गावाची लोकसंख्या सहा हजारांच्या जवळपास आहे. गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तब्बल पंचवीस दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने आजूबाजूच्या शेतात जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने जवळच्या तामसवाडी (ता. पारोळा) धरणावरून महाजल योजना मंजूर केली आहे. तेथून सुमारे सात किलोमीटरची जलवाहिनी देखील टाकली आहे. मात्र, या जलवाहिनीचे पाईप आकाराने लहान असल्याने व ठिकठिकाणी ‘लिकेज’ असल्याने गावाला पुरेसे पाणीच मिळत नाही. येथील पाणीटंचाईची प्रशासनाकडून दखलच घेतली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

हातपंप भागवतो तहान 
कुंझर गावात एकूण सहा हातपंप असून त्यातील दोनच हातपंप सध्या सुरू आहेत. एका हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे या हातपंपावर पाणी भरण्यासाठी दिवसरात्र गर्दी असते. दुसऱ्या हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी त्या पाण्याचा इतर वापरासाठी उपयोग केला जात आहे. गावातील चार हातपंप बंद असून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. गावात सार्वजनिक विहीर असून ती कोरडीठाक झाली आहे. तीन वर्षापूर्वी या विहिरीवर पाणी काढताना तरुणाचा मृत्यू झाला होता. सद्यःस्थितीत पाणीच नसल्याने ग्रामस्थांना शेत शिवारातून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. 

बोअरवेलवाले ठरले जलदूत 
गावात निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता, ज्या ग्रामस्थांनी आपल्या स्वतःसाठी खाजगी बोअरवेल केले आहेत. त्यातील काही जण कुठलाही मोबदला न घेता ग्रामस्थांना पाणी देत आहेत. मात्र, अशांच्या बोअरवेल देखील आता आटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनाच त्यांचे पाणी पुरत नाही. तर काही बोअरवेलधारकांच्या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. मात्र, वीज बिल जास्तीचे येत असल्याच्या कारणामुळे ते भरू देत नाही, असे येथील महिलांनी सांगितले. मात्र, सध्याच्या टंचाईत जे बोअरवेलवाले ग्रामस्थांना पाणी देत आहेत, ते आज गावातील गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत. 

ग्रामस्थ म्हणतात..... 
शेती कामांना जाता येत नाही 
सुलभाबाई कांबळे : पाणी दररोज लागत असल्याने सकाळी तीन वाजेपासून हातपंपावर नंबर लावावा लागतो. काही वेळा दूरवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी वेळ लागत असल्याने शेती कामाला जाताच येत नाही. परिणामी रोजंदारी बुडते. त्यामुळे काहीही करून तातडीने पाण्याची व्यवस्था करावी. 

पायपीट करून पाणी आणावे लागते 
छायाबाई पाटील : पाण्यासाठी बोअरवेल मालकांच्या विनवण्या कराव्या लागतात. काही वेळा ते देखील पाणी देत नाहीत. परिसरात एक किलोमीटरवर अंतरावरून पायपीट करून पाणी आणावे लागते. दुपारी रणरणते ऊन असल्यामुळे पहाटे लवकर उठून पाणी आणावे लागत असल्याने आम्हा महिलांचे हाल होत आहेत. 

टँकरने पाणीपुरवठा करावा 
जितेंद्र राजपूत : पिण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या विहिरीत टँकरने पाणी टाकावे. जेणेकरून या विहिरीवरून गावाला योग्य त्या प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः गावात येऊन पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घ्यावी. 

तामसवाडी धरणाजवळ आम्ही एक विहीर अधिग्रहण केली आहे. या विहिरीवरून अकराशे फूट पाइपलाइन करून तेथून गावाच्या जलस्वराज योजनेच्या विहिरीत पाणी टाकले जात आहे. ज्यामुळे गावातील एका भागात पाणी मिळू लागले आहे. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- अंजु सोनवणे, सरपंच ः कुंझर (ता. चाळीसगाव)

Web Title: drought situation in Chalisgaon