झळा दुष्काळाच्या : कोरड्याठाक जमिनीमुळे ५० वर पाणी योजनांना कुलूप 

yeola
yeola

येवला : तालुक्यातील तब्बल ४१ गावांसाठी विविध निधीतून पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या असल्या तरी त्यातील केवळ २३ गावातीलच योजना आजमितीस सुरू आहे.भूजल पातळी कमालीची घटल्याने व थेंबभर पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या योजना बंद अवस्थेत असून काही योजनांना राजकीय वादाची किनार आहे. अशा तब्बल ४८ गावातील योजनांना आज कुलूप लागल्याने येथे पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे योजना बंद पडलेल्यासह सुरु असलेल्या गावात देखील वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणी होऊ लागली आहे.

ब्रिटिश कालीन टंचाईग्रस्त असलेल्या या तालुक्यासाठी आत्तापर्यंत कुठलीच योजना दीर्घकालीन उपाय म्हणून पुढे आलेली नव्हती.मात्र याला अपवाद फक्त ३८ गाव पाणीपुरवठा योजना ठरली असून मोठा साठवण तलाव आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे या योजनेने आज ५५ गावे टँकरमुक्त झाली आहे.

तालुक्याची भौगोलिक स्थिती बघता उत्तर पूर्वेकडील अनेक गावे उंच व डोंगराळ भागात आहेत त्यामुळे येते ३८  गावचे पाणी पोहोचले नाही. अशा गावात स्थानिक उद्भवाच्या आधारे वेगवेगळ्या शासकीय निधीतून ७१ नळ पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. यातील बोटावर मोजण्याइतक्या २३ योजना आज सुरू आहे. पाणीच नसल्याने यातील अनेक योजना केवळ आठमाही ठरत असून उन्हाळा सुरू झाला की उद्भव कोरडे झाल्यावर योजनाही बंद होतात,अशा २० ते २५ योजना असल्याचेही चित्र आहे.

३८ गावमुळे पाणी योजना जिवंत 
३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे या गावांचा कायमचा प्रश्न मिटला आहे.किंबहुना आज ५५ गावांना हि योजना पाणी देत असून योजनेमुळे पाण्याचा उद्भव कोरडे असलेल्या किमान १० गावाच्या पाणीपुरवठा योजना देखील जिवंत झाल्या आहेत. मात्र योजनेने अर्धा तालुका टँकरमुक्त केल्याचे समाधान असले तरी यंदाची स्थिती भयावह असल्याने या टॅंकरमुक्त गावातून देखील वाड्या-वस्त्यांवरून प्रशासनाकडे टँकरची मागणी होऊ लागली असून काही ठिकाणी तर टंकर सुरु करण्यात आले आहे.

या गावात नळांना पाणी 
बंधारे,३८ गाव योजना व  इतर उद्भवाच्या आधारे आज मितीस तळवाडे,कोटमगाव बुद्रुक व खुर्द,कानडी, महालखेडा,पाटोदा, नायगव्हाण, भाटगाव, लौकीशिरस, दोन्ही चिचोंडी,अंगुलगाव,भिंगारे,देवरगाव,गोपाळवाडी,मुखेड, सत्यगाव, जवळके, ठाणगाव, नागडे या ठिकाणच्या पाणी योजना सुरू असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.राजापूरच्या योजनेला तर पाण्याचा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. मात्र येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी शक्कल लावत पाणी पंप घेऊन टँकरचेच पाणी थेट पाण्याच्या टाकीत टाकून मग नळाद्वारे गावात घरोघरी आठवड्यातून एकदा पाणी देण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. 

आकड्यात पाणीयोजना....
=एकूण मंजूर योजना - ७१      
=पूर्ण झालेल्या योजना - १८
=भौतिकदृष्ट्या पूर्ण - २७
=प्रगतीत योजना - ५
=उद्भव कोरडा - ५
=समिती काम करत नाही - ४
=वीजबिल थकबाकी - २
=सुधारित प्रस्ताव शासनाकडे - १

“कोटमगाव देवीचे येथील पाणी योजना पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने बंधारा भरल्यामुळे सुरु होती.मात्र आता बंधारा कोरडा झाल्याने योजना बंद झाली असून गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.कोटमगाव विठ्ठलाचे येथील बंधाऱ्यात पाणी असल्याने योजना सुरु असली तरी पाणी आटत आले आहे.योजना सुरुळीत चालण्यासाठी येवला,मनमाडसाठी पालखेडचे आवर्तन सोडून आमचे बंधारे भरून द्यावेत.”
- नाना लहरे,कोटमगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com