मुलांसह तरुणाई नशेच्या आहारी

मुलांसह तरुणाई नशेच्या आहारी

जळगाव - आताची तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. पूर्वी ठराविक वयोगटातील लोक अमली पदार्थांचे सेवन करून नशा करीत असत. यात त्यांच्याकडून चरस, गांजा, अफू, सिगार, हुक्का यांचे प्रमाण अधिक होते; परंतु आता शहरात गांजाची सर्रास विक्री केली जात असल्याने तो ओढून नशा करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आताची तरुणाई व्यसनाधीनतेच्या आहारी गेली आहे. तरुणांसह अल्पवयीन मुलेदेखील वेगवेगळ्या प्रकारचा नशा करून अनुचित प्रकार करीत असल्याचे समोर आले आहे. यात गांजा ओढून नशा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात असलेल्या आदिवासी भागांमध्ये गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या ठिकाणांहून शहरात गांजाची तस्करी केली जात असून, तो शहरात दलालांमार्फत सहजतेने उपलब्ध करून दिला जातो. तसेच शहरातील काही ठराविक परिसरात गांजाची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वस्त म्हणून गांजाची नशा अधिक
दारू घेतल्यानंतर त्याची नशा काही काळापुरतीच होत असते. मात्र, दिवसातून दोन वेळा गांजा ओढल्यास दिवसभर त्याची नशा कायम राहते. इतर नशा करण्याच्या तुलनेत कमी खर्चात अधिक काळ नशा ठेवणारा गांजा अगदी कमी किमतीत शहरात विक्री केला जातो. त्यामुळे कमी इतर नशा होणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत सर्वांत स्वस्त नशा म्हणून गांजाचे सेवन केले जाते.

अल्पवयीन मुलेही आहारी
पूर्वी ठराविक वयोगटातील नागरिकांकडून गांजा ओढून नशा केली जात होती. गांजाची नशा करण्यासाठी अत्यंत कवडीमोल रक्कम मोजावी लागते. त्यामुळे तरुणांसह अल्पवयीन मुलांकडून गांजा ओढून नशा केली जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

काही भागांत सर्रास विक्री
जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा तसेच बऱ्हाणपूर या ठिकाणांहून गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. दलालांकडून तस्करी होत असलेल्या गांजाची साठवणूक केली जाते. त्यानंतर या गांजाची विविध आकारांत पॅकिंग करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. पूर्वी गांजा हा ठराविकच लोकांकडूनच विक्री केली जायचा; परंतु आता शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम गांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com