दर गुरुवारी आता ‘ड्राय डे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

‘गुरुवारी पाणीपुरवठा बंद करू नये’
जुने नाशिक ः महापालिकेकडून गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेऊन अन्य दिवशी पाणीकपात करावी, अशी मागणी नगरसेविका समीना मेमन यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. शुक्रवारचे मुस्लिम बांधवांमध्ये विशेष महत्त्व आहे. विशेष नमाज, तसेच धार्मिक विधी असल्याने शुक्रवारी पाण्याची मागणी अधिक असते. गुरुवारी पुरेसे पाणी मिळाल्यास शुक्रवारची पाण्याची मागणी पूर्ण होण्यास मदत होते. परंतु गुरुवारीच पाणीपुरवठा बंद राहिला तर मुस्लिम बांधवांना जुने नाशिक, वडाळागाव भागातील बांधवांना मोठी अडचण जाणवणार आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळेसही अशीच मागणी करण्यात आली होती. आयुक्तांनी मागणीचा विचार करता पाणीपुरवठा बंदमधून वगळले होते. यंदाही तसाच निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

नाशिक - गेले दोन दिवस शहर व परिसरात मुसळधार झाली असली, तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने अखेरीस पाणीकपातीबरोबरच आता महापालिका प्रशासनाने आठ दिवसांतून एकदा दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे रोजचे ५० ते ६० दशलक्ष लिटर व आठ दिवसांतून एकदा ४६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जाणार आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही तोपर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल.

गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याचा परिणाम यंदा पावसाळा सुरू झाला तरी जाणवत आहे. गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने गंगापूर धरणातील पाण्याची पाहणी केली. त्या वेळी इन्टेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी पोचल्याचे निदर्शनास आले. इन्टेक वेलपर्यंत पाणी आणण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू करण्यात आले.

पावसाला सुरवात झाली असली, तरी निरंतर पाऊस राहील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे गंगापूर धरणातील सद्यःस्थितीतील पाणी वाचविणे गरजेचे असल्याचा अहवाल प्रशासनाकडून महापौर रंजना भानसी यांना सादर करण्यात आला. त्या वेळी पाणीकपात गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार महापौर भानसी यांनी जेथे दिवसातून दोनदा पाणी येते, तेथे एकवेळत पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. कपातीच्या माध्यमातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जात आहे.

असमाधानकारक पाणीसाठा
एकवेळ पाणीकपात केल्यानंतर प्रशासनाने दोन दिवस पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी (ता. २) त्या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला. धरणातील पाणीपातळी अद्याप समाधानकारक नसल्याने आठ दिवसांतून एकदा म्हणजे, दर गुरुवारी संपूर्ण दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवार(ता. ४)पासून हा निर्णय अंमलात येईल. नवीन कपातीतून ४६० दशलक्ष लिटर पाणी वाचविले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry Day Thursday Water Shortage