रोखीवरून तिढा सुटला नसल्याने बाजार समितीचे सलग तिसऱ्या दिवशी कामकाज ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

संचालक मंडळाने शेजारच्या येवला, चांदवड, पिंपळगाव, लासलगाव येथील व्यापारी रोखीने व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आणून देऊनही नांद्गावच्या व्यापारी असोसिएशनने आपली भूमिका बदललेली नाही. 

नांदगाव : तीन जिल्ह्यात कांद्याच्या भावाला बऱ्यापैकी तेजी मिळत असतांना धनादेशाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिल्याने आजही बाजार समितीचे कामकाज ठप्प राहिले. मात्र बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या बोलठाण व न्यायडोंगरी येथे शेतमालाचा लिलाव झाला.

दरम्यान 'सेम डे'चे धनादेशाचे वाटप बाजार समितीनेच करावे अशी आडमुठी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत बाजार समितीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती तेज कवाडे यांनी केला शेतकऱ्यांना पेमेंट रोखीने करायचे की धनादेशाचे  निर्माण झालेला तिढा सुटला नसल्याच्या पार्श्वभूमीवर परस्पर शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आज संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आला.  

बाउंस होणारे धनादेश, पुढच्या तारखा घालून देण्यात येणारे धनादेश, धनादेश वटण्यासाठी होणारा विलंब यातील तिढा सुटत नसल्याने व यामुळे दिवसेंदिवस व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये कटुता वाढत असल्याने नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने, व्यापारी वर्गाने रोखीने व्यवहार करावेत असा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला असला तरी व्यापारी त्यास अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याची माहिती समितीचे सभापती तेज कवडे यांनी दिली.

नोटाबंदीनंतर शेतमालाचे पैसे धनादेश व आरटीजीएस(ओंन लाईन) च्या माध्यमातून अदा होऊ लागल्यावर प्रत्यक्षात धनादेश जमा होण्यासाठी विलंब होऊ लागला शहरात नसलेल्या बाहेरगावच्या बॅंकचे धनादेश पुढच्या तारीख टाकून देण्यात येऊ लागल्याने व वारंवार चेक बाऊस होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या होत्या. बाजार समितीने कडक स्वरूपाचे निर्बंध घालून परिस्थितीत सुधारणा झाली नाही त्याचा फायदा घेत रोखीने पैसे हवे असल्यास अनाधिकाराने तीन टक्के रक्कम कपात करून ते पैसे देण्याचा गैरप्रकार वाढू लागल्याने बाजार समितीने जोवर रोख पैसे दिले जात नाही.

तोवर लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र  त्याला प्रत्युत्तर म्हणून व्यापारी असोसिएशनने लिलावाच्या दिवशीचाच धनादेश देऊ. रोखीने रक्कम अदा करण्यास कायदेशीर अडचण येते असे कारण दाखवून ३२ व्यापार्यांच्या सह्यांचे निवेदन समितीला दिले. 

संचालक मंडळाने शेजारच्या येवला, चांदवड, पिंपळगाव, लासलगाव येथील व्यापारी रोखीने व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आणून देऊनही नांद्गावच्या व्यापारी असोसिएशनने आपली भूमिका बदललेली नाही. आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक खरेदी केल्याने पेच निर्माण होतात. या धंद्यात कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने भांडवल तयार ठेवावे लागते. काही व्यापारी खरेदी केल्यानंतर धनादेश देतात. मात्र बँक खात्यात तेवढ्या रकमेची तजवीज केलेली नसते. म्हणून धनादेश बाउंस होतात. खरेदी केलेला माल दुसरीकडे विकून ते पैसे जमा व्हायला वेळ लागतो. यामुळे कमी भांडवलात मोठी उलाढाल करण्याचा प्रयत्न फसतो. परिणामी धनादेश बाउंस झाल्याचा दंड भरण्याची वेळ शेतकर्यावरच येते.  .

सभापती तेज कवडे यांनी संचालक मंडळाची भूमिका मांडली. यावेळी सचिव अमोल खैरनार, माजी सभापती विलास आहेर, राजेंद्र देशमुख, यांनी बैठकीत सहभागी होते. भास्कर कासार, दिलीप पगार, सोनावणे, पुंजाराम जाधव, एकनाथ सदगीर, भाऊसाहेब सदगीर, यज्ञेश कलंत्री, बाळासाहेब कवडे, जितेंद्र गरुड आदी उपस्थित होते.

Web Title: Due to the absence of cash the market committee has Not working for the third consecutive day