टँकर देण्यास दिरंगाई केल्याने राजापूरकरांचा रस्ता रोकोचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

येवला : राजापूरची पाणी नसल्याने योजना बंद पडली तर प्रशासन टँकरने पाणीपुरवठयासाठी तयार होईना. या खेळात गावाची मात्र थेंबभर पाण्यासाठी वणवण होत आहे. महिलांचे हाल थांबत नसल्याने आता टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी (ता.१९) सकाळी ८ वाजता राजापूर येथे येवला-नांदगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी व महिलांनी दिला आहे.

येवला : राजापूरची पाणी नसल्याने योजना बंद पडली तर प्रशासन टँकरने पाणीपुरवठयासाठी तयार होईना. या खेळात गावाची मात्र थेंबभर पाण्यासाठी वणवण होत आहे. महिलांचे हाल थांबत नसल्याने आता टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी (ता.१९) सकाळी ८ वाजता राजापूर येथे येवला-नांदगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी व महिलांनी दिला आहे.

लोहशिंगवे येथुन असलेल्या पाणी योजनेची विहीर व बोअर आटल्याने गेल्या दोन महिन्यांंपासून पाणी पुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. तर अल्प पावसामुळे गाव, परिसरातील विहिरी जानेवारी पासूनच कोरड्या पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजने लगत खैराबाई पाझर तलाव असून पाझर तलावाच्या पाण्याचे आरक्षण व्हावे, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे, मात्र पुढे कार्यवाही झालेली दिसत नाही. या योजनेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात.

मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.ग्राम पंचायतीने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र टँकर सुरू होत नसल्याने १९ रोजी राजापूर येथे महिला वर्ग रास्ता रोको आंदोलन करणार आहे. निवेदनाच्या प्रति संबंधीत अधिकार्‍यांना पाठवण्यात आल्या आहे. निवेदनावर अशोक आव्हाड, सुखदेव मगर, त्र्यंबक वाघ, राहुल कासार, विठ्ठल जाधव, गायत्री सोनवणे, रजनी वाघ, अशोक मुंढे, शिल्पा धात्रक, योगिता घुगे, सरला ठाकरे, मंगला मोरे, छाया सानप, सोनाली कोळपकर, नंदा कासार, वंदना सानप, वंदना जाधव, धनश्री जाधव, सिंदूबाई भाबड, सतीश वाघ, नवनाथ सोनवणे, विलास घुगे, सुनीता दळवी, मनीषा जगताप, सरला इप्पर, जिजाबाई घुगे आदींच्या सह्या आहेत.

ठराव झाला पण पुढे गेलाच नाही...
खैराबाई पाझर तलाव आरक्षणाचा ठराव मी ग्राम सभेत केला असताना,तो ठराव पुढे गेला नाही.गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या खाजगी बोअर वेल वरून जनतेला पिण्यासाठी पाणी देत असून आता तरी जागे व्हावे अशी अपेक्षा भास्करबाबा दराडे यांनी व्यक्त केली आहे.

खैराबाई पाझर तलावांच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व्हावे असा ठराव १५ ऑगस्ट रोजीच्या ग्राम सभेत झाला आहे. ठरावाच्या प्रति काही ग्रामस्थांनी घेतलेल्या आहे. अद्याप पुढील कार्यवाहीसाठी ठराव पाठवलेला  नाही. गावात टँकर सुरू करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी सांगितले.

"येथील पाणीप्रश्न वर्षानुवर्षे असूनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचे दरवर्षी रास्ता रोको केल्याशिवाय टँकर सुरू होत नाही. पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र पाणी मिळत नाही."
- अशोक आव्हाड, शिवसेना शाखा प्रमुख राजापूर

Web Title: Due to delaying the tanker rajapur villagers rastaroko