दुष्काळामुळे मेंढपाळांवर उपासमारीची वेळ 

दुष्काळामुळे मेंढपाळांवर उपासमारीची वेळ 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - गावाकडे प्यायला पाणी नाही, मेंढ्यांना चारा मिळत नाही म्हणून अन्य शिवारात जाऊन शेतजमीन सुपीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना सोबत घेऊन नेहमीच भटकंती करावी लागते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने मेंढपाळांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे चित्र तालुक्यातील मेंढपाळ बांधवांच्या कळपांमध्ये गेल्यानंतर दिसून येत आहे. आपल्या पोटाला अन्न मिळाले नाही तरी चालेल पण मेंढ्यांना पाणी तरी मिळाले पाहिजे म्हणून शेतात तात्पुरते कृत्रिम शेततळे तयार करुन मेंढ्यांची तहान भागवावी लागत आहे. मेढ्यांसाठी पाणी मागणाऱ्या मेंढपाळांना पाणी व चाऱ्याअभावी शेतकऱ्यांकडूनही थारा मिळत नसल्याचे विदारक चित्र चाळीसगाव तालुक्यात दिसत आहे. 

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत या भागात आलेले मेंढपाळांना अक्षरशः उपाशीपोटी फिरुन मेढ्यांसाठी चारा व पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यात पोटाला चिमटा देऊन मेंढरे जतन करावी लागत आहे. चाळीसगाव तालुक्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीपासूनच दुष्काळाचे चटके बसत आहेत. यात सर्वाधिक फटका मेढपाळांना बसला आहे. उघड्यावर संसार घेऊन फिरणारे नाशिक जिल्ह्यातील मेंढपाळ सध्या चाळीसगाव तालुक्यात चाऱ्यासाठी मेंढ्यांना घेऊन दाखल झाले आहेत. चाराटंचाईसह पाण्याची टंचाई देखील निर्माण झाल्याने मेंढपाळबांधव हताश झाले आहेत. 

हाल थांबता थांबेना 
उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करुन शेतात उघड्यावरच पाडावा टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकऱ्यांना अक्षरशः विनवण्या कराव्या लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेती खाली झाली आहे, अशा ठिकाणी जवळपास चाऱ्याची उपलब्धता व क्षेत्राचा अंदाज घेऊन मेंढपाळ बांधव मुक्काम करतात. पोटच्या मुलांपेक्षा मेंढ्यांची काळजी घेणाऱ्या मेंढपाळांना रणरणत्या उन्हातान्हात मेंढ्यांसाठी चाऱ्याची तजवीज करुन ठेवावी लागत आहे. दुपारी कडक ऊन, सायंकाळी वातावरणात निर्माण झालेला उकाडा अशातच त्यांचा दिवस जातो. अनेक जण पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करतात. सध्या मोजक्याच गावातील धनगर बांधवांकडे शेळ्या, मेंढ्या आहेत. शेकडो रिकाम्या हातांना उद्योग देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. मात्र, दुर्लक्षित असलेल्या या व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही पाहीजे तशी खुली झालेली दिसत नाहीत. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचा सामना मेंढपाळांना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही मेंढपाळ आपल्याच रोजच्या जात असलेल्या दिनचर्येत खूश दिसतात. 

वाडे परतीच्या प्रवासाला 
चाळीसगाव तालुक्यातही अनेक मेंढपाळ आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून मेंढपाळ मेंढ्या घेऊन येतात. सध्या गिरणा पट्ट्यातील काही गावांमध्ये मेंढपाळांचे वास्तव्य दिसून येत आहे. हिरवा चारा मिळेल या आशेवर ते आले असून त्यांना चारा मिळत नसल्याने वणवण फिरावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने काही मेंढपाळांचे वाडे परतीच्या मार्गावर लागले आहेत. विविध जातींच्या वृक्षांचा, झाडाझुडपांचा पालापाचोळा खाणाऱ्या मेंढ्यांना निकृष्ट चाऱ्यामुळे विविध रोगांची लागण होताना दिसत आहे. अशिक्षित मेंढपाळ रानावनात भटकंती करुन पारंपरिक उपचाराचा अवलंब करीत असतात. भटकंती करणाऱ्या धनगर बांधवांच्या शेळ्या मेंढ्यांना किमान या दिवसात तरी जंगले मोकळी करुन द्यावीत, अशी अपेक्षा मेंढपाळ बांधवांनी व्यक्त केली. 

चारा छावण्यांना मुहुर्त कधी? 
चाळीसगाव तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही चारा छावणी सुरु झालेली नाही. चारा छावण्या सुरू करण्याचा मुहुर्त कधी सापडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चारा छावणी तातडीने सुरु केल्यानंतर त्यात मेंढपाळांच्या मेंढ्यांनाही लाभ मिळावा, अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी केली आहे. 

मेंढपाळ म्हणतात......  
जंगलात चराईची परवानगी मिळावी 
चैत्राम अहिरे (दहीवद, ता. चाळीसगाव) -
 माझ्याकडे चारशे मेंढ्या आहेत. सध्या चाऱ्याअभावी काही वेळा मेंढ्यांना उपाशी पोटी कोंडावे लागते. जंगल भागात अतिक्रमण झाले असून जंगलाच्या परिसरात मेंढ्यांना चराईसाठी शासनाने बंदी केली आहे. सध्या चारा कुठेही उपलब्ध नसल्याने या दिवसात तरी जंगलात चारा चराईची परवानगी मिळावी. 

कुटुंब सांभाळावे की मेंढ्यांना सांभाळावे 
शातांराम शेलार (नांदगाव) - आम्हाला शेतशिवारात कुणीही थारा देत नाही. सध्या परिसरात कुठेही पाणी नसल्याने मेढ्यांचे हाल होत आहेत. ज्या ठिकाणी पाणी आहे तेथेच थांबावे लागते. १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती यावेळी निर्माण झाली आहे. आम्हाला कुंटुब सांभाळावे की मेढ्या अशा दुहेरी संकटात आम्ही सापडलो आहोत. 

भाकर नको पण चारा उपलब्ध करावा 
दादाभाऊ आयनर (उपखेड, ता. चाळीसगाव) - डोक्यावर संसाराचा गाडा ओढत भर उन्हात चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मेढ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुलांना शिक्षणापासून नाइलाजास्तव वंचित ठेवावे लागते. शासनाने आमचा विचार करावा या दुष्काळी परिस्थिती आम्हाला पोटाला भाकर नको, परंतु मेढ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com