लेडी सिंघम नांदूरकरांच्या धसक्याने स्वयंस्फूर्तीने काढली अतिक्रमणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

येवला : एखाद्या अधिकाऱ्याचा दरारा तयार झाला की, बस नाम ही काफी है! अशी अवस्था होते. असाच काहीसा अनुभव येवलेकर पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या बाबतीत घेत आहे. मागील तीन दिवसांत त्यांनी शहरात फिरून नियमबाह्य असलेली गटारीवरील तसेच गटारीच्या पुढे आलेली अतिक्रमणे काढण्याची तंबी दिली अन् जादूची कांडी फिरावी तशी नागरिकांनी स्वतःहून चारशे ते पाचशे वाढीव अतिक्रमणे काढून घेतली. आज शुक्रवारी तर विविध भागात अनेकजण आपले अतिक्रमण काढण्यात मग्न असल्याचे चित्र होते.

येवला : एखाद्या अधिकाऱ्याचा दरारा तयार झाला की, बस नाम ही काफी है! अशी अवस्था होते. असाच काहीसा अनुभव येवलेकर पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या बाबतीत घेत आहे. मागील तीन दिवसांत त्यांनी शहरात फिरून नियमबाह्य असलेली गटारीवरील तसेच गटारीच्या पुढे आलेली अतिक्रमणे काढण्याची तंबी दिली अन् जादूची कांडी फिरावी तशी नागरिकांनी स्वतःहून चारशे ते पाचशे वाढीव अतिक्रमणे काढून घेतली. आज शुक्रवारी तर विविध भागात अनेकजण आपले अतिक्रमण काढण्यात मग्न असल्याचे चित्र होते.

शनिपटांगण व भाजी बाजारातील विस्कळीतपणा दूर करत तेथे शिस्त लावल्यानंतर नांदूरकरांनी आता शहरातील गल्ली बोळावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.शहरातील विविध भागात नागरिकांनी सर्रासपणे गटारीवर कच्चे पक्के स्वरूपाचे बांधकाम केले आहे. अनेकांनी तर आपली दुकाने व घरे देखील गटारींच्यावर बांधल्याचेही निदर्शनास आल्याने त्यांनी बुधवारपासून ही मोहीम हाती घेतली आहे.तीन दिवसांत त्यांनी शहरात फिरून तंबी देत स्वतःहून अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रस्त्याच्या कडेच्या गटारीवर तसेच त्याच्या पुढे आलेले शेड, बीम,
पायऱ्या, ओटे, घरे तसेच विविध लोकांच्या टपऱ्या व दुकाने यांची ८०० अतिक्रमणे निघाली असल्याने गल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

गंगादरवाजा भागातील अध्यक्षांच्या घरापासून गांधी मैदान पर्यंत, गंगादरवाजा रस्ता ते लक्ष्मीमाता मंदिर पर्यंत, आझाद चौक, टिळक मैदान, विंचूर चौफुलीवर पुन्हा आपले अनधिकृत बस्तान मांडणाऱ्यांसह आंबेडकर पुतळ्याजवळील टपऱ्या देखील हटवल्या. सुंदरनगर,स्टेट बँक परिसर या भागात देखील स्वतः मुख्याधिकारी यांनी आपल्या पथकासह पायी फेरी मारून सूचना दिल्या.

गटारींवर वाढीव बांधकामे, टपऱ्या,दुकाने अशी वाहतुकीला अडचणीची ठरणारी नियमबाह्य अतिक्रमणे पालिकेच्या पथकाने शोधून काढली होती. या सर्वांना मुख्याधिकारी नांदूरकर यांनी प्रथम गल्लोगल्ली फिरून सूचना देत स्वतःहून काढण्याच्या आवाहन केले. तसेच सहकार्य न केल्यास पालिका मोहीम राबवून त्याचा खर्च तुमच्यावर टाकेल. शिवाय या संदर्भात गुन्हे दाखल केले जातील अशी तंबीच दिली. त्यांचा दरारा इतका झाला की देवी खुंट, नागड दरवाजा, स्टेट बँकेचा परिसर, गंगा दरवाजा या परिसरातील नागरिकांनी स्वतःहून आपापले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.

आज शुक्रवारी त्यांनी विंचूर चौफुलीवर भल्या सकाळी तंबी दिल्यानंतर पन्नासवर व्यावसायिकांनी स्वतःहून वाढीव अतिक्रमणे काढली.त्याशिवाय स्टेट बँक,लक्कडकोट भागात गटारावरचे अतिक्रमणे तर काढलीच पण काहींनी घराचे वाढीव बांधकामेही काढली.सायंकाळी त्या लक्कडकोट भागात मोहीम राबवत होते. या ठिकाणी देखील अनेकांनी घराची वाढीव बांधकामे स्वतःहून काढली आहे.यामुळे शहराला एक वेगळी शिस्त लागत असल्याचे चित्र आहे.यामुळे बोळी झालेल्या गल्ल्याच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचेही दिसून आले.

“ज्यांचे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घेत आहे.विविध भागात पालिकेचे पथक मोजमाप करत असून १४  तारखेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर १६ ते १९ तारखेदरम्यान सकाळी व संध्याकाळी आम्ही विशेष मोहीम राबविणार आहोत. जेसीबी ट्रक्टरसह ५० कर्मचारी असणारी अतिक्रमणे नियोजनानुसार हटवतील.तत्पूर्वीच नागरिकांनी अतिक्रमण काढून घ्यावीत.”
संगीता नांदूरकर,मुख्याधिकारी,येवला

Web Title: due to fear of lady singham remove encroachment on self decision