दुर्गवीर प्रतिष्ठानने साल्हेर किल्ल्यावर शोधली शिवकालीन स्मृतीशिळा 

satana
satana

सटाणा - बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरुजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणार्‍या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गर्द झाडीत मराठा धाटणीची शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. सूरत लुटीनंतर साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी असलेले छत्रपती शिवाजी महाराज व साल्हेरच्या ऐतिहासिक लढाईच्या इतिहासाला या स्मृतीशिळेच्या माध्यमातून आता उजाळा मिळणार आहे. 

बागलाण तालुक्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तालुक्यात तब्बल सोळा किल्ले असून गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल व दुरूस्तीअभावी या किल्ल्यांची वाताहत झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या येथील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून गेल्या ४ वर्षांपासुन साल्हेर व मुल्हेर या गडकोटांवर स्वच्छता करून संवर्धन केले जाते. सध्या साल्हेर गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंदनबारीवरील केशरबागेत अनेक प्राचीन मंदिरे  उध्वस्त अवस्थेत असून मदिरातील देव उघड्यावर पडले आहेत. प्रतिष्ठानतर्फे देवाच्या मूर्त्यांची योग्य निगा राखून त्या व्यवस्थीत जागी ठेवल्या जात आहेत. आज किल्याखालील प्राचीन गावात इनामदार आळीतील बुरुजाची स्वच्छता करण्यासाठी जात असतांना मार्ग निश्चितीवेळी दुर्गवीरांना गर्द झाडीत मराठा धाटणीची स्मृतीशिळा आढळून आली. मात्र काटेरी झाडे झुडुपांमुळे त्यापर्यंत पोहोचणे अवघड होते. त्या जागेपर्यंत जाण्याचा मार्ग बनवल्यानंतर जमिनीत अर्धवट गाडलेले घरांचे जोते दिसले. काटेरी झुडुपे बाजुला करतांना अंगाला वरखडे बसून रक्त सुध्दा आले. अखेर सर्व अडथळे पार करून दुर्गवीरांनी ती जागा स्वच्छ करताच त्यांना एका पाठोपाठ ३ स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले.  

दुर्गवीरांनी त्या व्यवस्थित रचत जंगलातील फुले - फळे चढवुन तीला सुशोभित केले आणि त्यावर छत्रपती  शिवरायांची प्रतिमा ठेवून पुजन केले. स्मृतीशिळेतील दिवा लावण्याच्या जागेत दिवा देखील लावला. या स्मृतिशिळा संपुर्ण दगडात असुन त्यांची उंची चार फुट व रुंदी दिड फुट आहे.  एका बाजूस हिंदु पध्दतीचे  पद्म व वेलपट्टीचे चिन्ह असुन दिवा लावण्याची सोय देखील आहे. स्मृतिशिळेच्या खाली लिखान केलेले आहे. मात्र शेकडो वर्षे जमिनीत गाडले गेल्याने व  दुर्लक्षित झाल्यामुळे त्यावरील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. या मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे हेमंत सोनवणे, प्रविण खैरणार, रोहित जाधव, किशोर झोपळे, सुमित साबळे, उत्तम झोपळे यांच्यासह साल्हेर भटकंतीस आलेले नाशिक येथील युवक – युवती सहभागी होत्या.

सन १६७२ मध्ये साल्हेरच्या ऐतिहासिक लढाईतील वीरपुरुषांच्या  महान बलिदानाच्या व पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या स्मृतिशिळा असण्याची दाट शक्यता आहे. इतिहासाचा महान ठेवा या संवर्धन मोहिमेतुन बाहेर आल्यामुऴे साल्हेर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आणखी उजाळा मिळेल. संशोधकांनी व इतिहास प्रेमींनी यावर प्रकाश टाकावा.
- रोहित जाधव, दुर्गवीर प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com