ऐन दुष्काळात मका बियाण्यांच्या किंमतीत ४५० रुपयांची वाढ

organic-corn-seed-500x500.jpg
organic-corn-seed-500x500.jpg

येवला : पावसाळा सुरू झाला तरी, दुष्काळ अजूनही 'आ' करून आहे. पावसाचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरणीची शाश्वती नाही.  असे असताना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मका बियाणे कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे. मकाच्या चार किलोचा पिशवी मागे तब्बल २०० ते ४५० रुपयांपर्यंतची वाढ कंपन्यांनी केली असून मुगाची २०, बाजरीची ५० व तुरीच्या पिशवी मागे ३० रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात डोक्याला हात लावण्याची वेळ आणली आहे. शासनाने कंपन्यांना ही दरवाढ करण्याची परवानगी दिलीच कशी? असा सवालही व्यक्त होत असून झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

दुष्काळामुळे अगोदरच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बियाणे कंपन्याही चुना लावायला निघाल्याने शेतकरी पावसापूर्वी दरवाढीच्या धक्क्याने मेटाकुटीस आला आहे. मुळात जिल्ह्यात वर्षागणिक बदलत्या पावसाबरोबर पीक पद्धतीतही बदल होत असून मका व कांदे हे अर्ध्या जिल्ह्याचे लाडके व मुख्य पीक बनत आहे. त्यामुळे साहजिकच मकाच्या बियाण्याची मागणी वाढत आहे. पिकवलेल्या मकाला प्रक्रिया उद्योगाची मागणी वाढत असल्याने देशावर आणि परदेशातही चांगला भाव मिळतो. यावर्षी तर, मकाचे दर इतिहासात प्रथमच दोन हजाराच्यावर गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळातही चांगला आधार मिळाला होता. मात्र,  या वाढत्या मागणीचा गैरफायदा कंपन्यांनी घेतलेला दिसत आहे. शासनाने ही ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना भुर्दंड बसणारी दरवाढ कंपन्यांना कशी करू दिली? शासनाचे कंपन्यांवर नियंत्रण नाही का? असे सवाल आता शेतकरी करू लागले आहे.
प्रतिकारक अन उगवण क्षमता वाढवली

काही कंपन्यांनी मका बियान्याना रोगप्रतिकारक औषधांचे वेस्टन लावले आहे तर काहींनी उगवण क्षमतेत वाढ करण्याची उपाययोजना केल्यामुळे दर वाढले असल्याचे सांगितले जात आहे. हि कारणे गृहीत धरली तरी ५० ते १०० रुपयांची दरवाढ मान्य झाली असती.मात्र झालेली दरवाढ ही निम्म्याने असल्याने धक्कादायक मानली जात आहे. पायोनियर कंपनीने सिटी ३४०१ नावाचे नवीन वाण बाजारात आणले असून हे वान लष्करी अळीचा प्रतिकार करेल अशी सिटी प्रक्रिया त्यावर केली आहे. यामुळे या वानाच्या चार किलोच्या पिशवीची विक्री किंमत सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांपर्यंत आहे. पायोनियरच्या मकाची मागील वर्षी १२५० रुपये विक्री होती तीच यावर्षी १४०० रुपये झाली तर डिकाल्ब ९१४१,हायटेक ५१०१ ची किंमत ८०० वरून १२०० रुपये आणि लक्ष्मी ९४९५ या वानाची किंमत ८०० वरून१२५० रुपये पर्यंत वाढली आहे.
कडधान्याचे दरही वाढले

कपाशीच्या बीटी २ बियाण्यांचे दर शासनाने प्रती पिशवी ७३० रुपये दोन वर्षापूर्वी निच्छित केले असून यात कुठलीही वाढ झाल्लेली नाही. मात्र मुगाच्या एक किलोच्या पिशवीमागे वीस रुपये तर तुरीच्या एक किलोच्या पिशवीमागे ३० रुपयापर्यंत वाढ झाली आहे.बाजरीच्या दीड किलोच्या पिशवीची किंमत ३५० वरून चारशे रुपयांपर्यंत गेल्याने पन्नास रुपयाची वाढ झाली आहे.
 
“यावर्षी मका कंपन्यांनी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी दणका दिला आहे. वास्तविक शासनाचे या कंपन्यांवर नियंत्रण असायला पाहिजे आणि शासनाच्या परवानगीने अशा दरवाढ झाल्या पाहिजे. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ही दरवाढ मागे घेण्यास बियाणे कंपन्यांना भाग पाडावे.”
- संध्या पगारे, शेतकरी संघटना नेत्या
 
“अजून पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यात मक्यायच्या क्षेत्रात वाढ होईल असे चित्र आहे. मात्र शेतकरी जेव्हा दर विचारणी करतात तेव्हा वाढलेले दर ऐकून अनेकांना धक्काच बसत असून दुष्काळ असल्याने बियाणे दरात झालेली वाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचे सांगितले जात आहे.कडधान्यांच्या बियाण्यात काही अंशी वाढ झाली आहे,कपाशीचे दर मात्र स्थिर आहेत.”
- नितीन काबरा, संचालक द्वारका एजन्सी, येवला

असे वाढले मका बियाणे दर...
कंपनी - २०१८चे दर- २०१९ चे दर
अडव्हँटा ७५१ - ९०० - ११००
अडव्हँटा ईलाइट - १०८० - १३००
सिजेंटा ६२४० - ८०० - ११००
महिको ३८४५ - ८०० - ११००
जेके ५०२ - ७५० - ११००
धान्या ८२५५ - ८०० -११००
राशी - ७०० -९५०
हायटेक ५१०१ - ८०० - १२००
डिकाल्ब ९१४१ - ८०० - १२००
पायोनियर ३५०१ - ९०० - १२०० 
महिको ३८३८ - ६०० - ८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com