शेतकरी कर्जमाफीचे सरकारचे धोरण सुस्पष्ट नाही; खडसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने द्विधा मन:स्थिती दिसून येत आहे. अगोदर एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली, त्यातही वेळोवेळी बदल केले. त्यामुळे सहकारी बॅंका व त्यांच्या शेतकरी सभासदांना अद्यापही धोरण सुस्पष्ट झालेले नाही.

जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

बॅंकेला या वर्षी तब्बल 53 कोटी 75 लाखांचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

खडसे म्हणाले, की शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने द्विधा मन:स्थिती दिसून येत आहे. अगोदर एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली, त्यातही वेळोवेळी बदल केले. त्यामुळे सहकारी बॅंका व त्यांच्या शेतकरी सभासदांना अद्यापही धोरण सुस्पष्ट झालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र त्यावरील व्याज भरण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. शासन बॅंकेकडे व्याज मागते, बॅंक शेतकऱ्यांकडे व्याज मागते, शेतकरी शासनाने कर्जमुक्त केल्याचे सांगून व्याज शासनाकडून घ्यावे, असे सांगत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील व्याजाबाबत शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा, याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव येथे बुधवारी (ता. 22) करणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse statement on farmer loan waiver