मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहताना चंद्रकांतदादांनी माझी अवस्था पाहायला हवी होती- खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

- मुख्यमंत्री भाजपचाच होणार : आमदार खडसे 
- दिल्लीला सुनावणीमुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होणार नाही 

भुसावळ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर माझे काय हाल झाले, याचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास केला नसावा, अशी कोपरखळीही खडसे यांनी मारली आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या सभेचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री खडसे हे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण ज्येष्ठ नेते असतांनासुद्धा इतर मंत्र्यांना क्लिनचीट दिली. मात्र आपणास विधानसभेत क्लीनचिट देण्यात आले नाही, असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. त्यावेळी माझ्यावर काही आहेच नाही, तर क्लीन चीट देण्याची गरज काय? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार. मात्र मुख्यमंत्री हा भाजपचा होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्यांना पक्षात घेऊ नका असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे मत व्यक्त केले आहे. त्या मताशी मी सहमत असल्याचेही खडसे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी मतभेद नाही 
माझी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात तारीख असल्यामुळे आज रात्रीच दिल्लीला जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात सहभागी राहणार नसल्याची नाही. मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यात मतभेद नाही. आमच्यातील मतभेद हे केवळ मीडियाने मोठे केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपण या संदर्भात केवळ पक्षांतर्गत विषय न मानता मीडियासमोर जगजाहीर मांडले. त्यामुळे पक्षशिस्त मोडण्यात आली का ? असे विचारले असता मला कुणीही पक्षशिस्त शिकवू शकत नाही, असे खडसे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadses warns Chandrakant Patil after his Dreaming cm Post