एकनाथ शिंदेच्या सुरक्षारक्षकाची घोटी टोलनाक्‍यावर तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

घोटी - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने काल (ता. २४) रात्री घोटी टोलनाक्‍यावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत जोरदार फटका मारल्याने काच फोडली. त्यामुळे टोलनाक्‍यावरील कर्मचारी संदीप धोंगडे जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने काल (ता. २४) रात्री घोटी टोलनाक्‍यावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत जोरदार फटका मारल्याने काच फोडली. त्यामुळे टोलनाक्‍यावरील कर्मचारी संदीप धोंगडे जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (ता. २४) मध्यरात्री दीडच्या सुमारास सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे आपल्या ताफ्यासह नाशिकमार्गे मुंबईला जात असताना ही घटना घडली. टोलनाक्‍यावरील रांग क्रमांक सहावर मंत्रिमहोदयांची गाडी जात असताना गाडीचा पास देण्यास टोलनाक्‍याच्या कर्मचाऱ्याकडून उशीर झाला. याचा सुरक्षारक्षकाला राग आला. सुरक्षारक्षकाने संबंधित कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. ‘काय रे समजत नाही का? मंत्री आहेत, इतका उशीर का लागतो,’ असे सांगत कर्मचारी बसलेल्या केबिनवर जोरदार फटका मारला. या जोरदार फटक्‍यामुळे केबिनची काच फुटली व त्या काचेच्या तुकड्यांचा काही भाग थेट संबंधित कर्मचाऱ्याच्या तोंडावर लागला.

कर्मचाऱ्याच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. जखमी झालेला कर्मचारी पाहताच सुरक्षारक्षकाने तत्काळ पोबारा केला. कर्मचाऱ्यास तत्काळ नाशिकच्या वक्रतुंड रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसेंदिवस मंत्री आणि पोलिसांकडून वाढणाऱ्या या घटनांमुळे कर्मचाऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे.

टोलनाक्‍यावर मारहाण नाही - एकनाथ शिंदे
घोटी येथील टोलनाक्‍यावर मध्यरात्री घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मात्र, बेदम मारहाण झाल्याचे जे चित्र रंगविले जात आहे, ते वस्तुस्थितीला धरून नाही. अनेक वर्षे मी सार्वजनिक आयुष्यात असून, माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडून कधीही अनुचित कृती घडलेली नाही. माझी गाडी कधी सिग्नल तोडत नाही. टोलनाक्‍यांवरही रांग सोडून माझी गाडी जात नाही. टोलनाक्‍यांवर रांगेत पुढे असलेल्या वाहनांना प्राधान्य देण्याच्या सक्त सूचना माझ्या चालकाला कायमस्वरूपी दिलेल्या आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: eknath shinde security damage to toll naka