विषय समित्या निवडणुकीतून भाजप, राष्ट्रवादीची माघार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने घेतल्याचे समजते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या भाजपने आता निवडणुकीचा कौल शिवसेनेला असल्याचे मान्य केल्याने ही भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. 

नाशिक - जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने घेतल्याचे समजते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या भाजपने आता निवडणुकीचा कौल शिवसेनेला असल्याचे मान्य केल्याने ही भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीनेही सदस्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी रविवारी (ता. 26) बैठक बोलावल्याचे समजते. भाजपने माघार घेतल्याने राष्ट्रवादीही तटस्थ राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची 5 एप्रिलला निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व माकपचे समीकरण कायम राहणार आहे. यामुळे त्यांच्याकडे 37 चे संख्याबळ कायम असून, राष्ट्रवादी-भाजपचे संख्याबळ 35 आहे. 

जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची करून शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी अनेक युक्‍त्या करूनही त्यांना अपयश आले. यामुळे आता विषय समित्यांच्या निवडणुकीत ते पुन्हा नव्या दमाने तयारी करतील, असे बोलले जात होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत त्यांच्या गोटात येऊ शकतील, अशा माकप व अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. यामुळे आता अपक्ष व माकपच्या सदस्यांना शब्द दिल्याप्रमाणे पदे दिली जाणार असल्याचे बोलले जाते. यामुळे भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊनही पुन्हा तोंडघशी पडण्यापेक्षा तटस्थ राहण्याची भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मात्र सदस्यांचे मनोगत जाणून घेऊन त्यानंतर भूमिका ठरविणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य सदस्यांची शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा होती. मात्र, मोजक्‍या नेत्यांच्या हट्टापायी त्यांना भाजपबरोबर जावे लागल्याने पक्षातील सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता पुन्हा भाजपबरोबर जाण्याचा विचार केल्यास सदस्यांचा असंतोष उफाळून येऊ नये म्हणून राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: election committees BJP, NCP retreat