esakal | वीजबिलप्रश्‍नी मनसेकडून फुटाणे भिरकावत निषेध 

बोलून बातमी शोधा

वीजबिलप्रश्‍नी मनसेकडून फुटाणे भिरकावत निषेध }

वीज कंपनीच्या पथकातील काही जण वसुलीदरम्यान अरेरावी करतात, दोन दिवसांचीही मुदत देत नाहीत.

वीजबिलप्रश्‍नी मनसेकडून फुटाणे भिरकावत निषेध 
sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे: थकीत वीजबिल वसुलीप्रश्‍नी गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्ष-संघटनांकडून विविध आंदोलने झाली. अधिकाऱ्यांसह राज्य शासनाला इशारे दिले. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रश्‍नी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या टेबलावर फुटाणे भिरकावत निषेध केला.‌ कार्यालयात खुर्चीही फेकली. या प्रकरणी मनसेच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

महावितरणकडून सध्या वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. मात्र वीज कंपनीच्या पथकातील काही जण वसुलीदरम्यान अरेरावी करतात, दोन दिवसांचीही मुदत देत नाहीत, असा आरोप मनसेने केला. एका महिलेने पती घरी नसल्याने दोन दिवसांनी बिल भरते अशी विनंती वसुली पथकाकडे केली. मात्र पथकाने ऐकून न घेतल्याने नाइलाजाने त्या महिलेने सोने गहाण ठेवून थकबाकी भरली. ही पद्धत पूर्णपणे चुकीची असल्याचे मनसेच्या प्राची कुलकर्णी म्हणाल्या. 

अन् वाद टोकाला 
महिलेला मिळालेल्या वागणुकीच्या अनुषंगाने जाब विचारण्यासाठी मनसेच्या श्रीमती कुलकर्णी, महानगराध्यक्ष संजय सोनवणे, हर्शल परदेशी हे शहरातील साक्री रोडवरील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. तेथे अधीक्षक अभियंता प्र. नि. पवनीकर यांना याबाबत विचारले असता ‘सोनं गहाण ठेवणं गौण’ असल्याचे उत्तर त्यांनी दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांचा संताप झाला, त्यावरून वाद वाढला. लोकांच्या हाताला काम नसल्याने ते फुटाणे खाऊन दिवस काढत आहेत, तुम्हीही फुटाणे खा, असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी श्री. पवनीकर यांच्या टेबलावर फुटाणे भिरकावले. वीज कंपनीचे पथक मोठमोठ्या संस्था, धनदांडग्यांच्या वसुलीसाठी जात नाहीत. छोट्या ग्राहकांना मुद्दाम त्रास दिला जातो, असा आरोप श्रीमती कुलकर्णी यांनी केला. 

पोलिसात गुन्हे दाखल

दरम्यान, वीज कंपनीच्या कार्यालयातील या गोंधळप्रकरणी मनसेच्या श्रीमती कुलकर्णी, श्री. सोनवणे, श्री. परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सायंकाळपर्यंत ते अटकेत होते. दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी धक्काबुक्की, अरेरावी केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे