वीज कर्मचारी- अधिकाऱ्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

धुळे - मोहाडी उपनगरात वीजचोरी शोधमोहीम व थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण करून त्यांच्याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा निषेध करत खोटा गुन्हा मागे घ्यावा, त्यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज महावितरण कंपनीच्या संयुक्त वीज कर्मचारी-अधिकारी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की सात डिसेंबरला दुपारी एकला मोहाडी उपनगरात शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रताप मचिये कर्मचाऱ्यांसमवेत वीजचोरी शोधमोहीम थकबाकी वसुलीसाठी गेले होते. तेथे राजेश ईश्‍वर पवार व प्रवीण ईश्‍वर पवार (रा. मोहाडी उपनगर) यांनी कंपनीची ७७ हजार ५७८ रुपयांची थकबाकी भरली नसल्याने त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला. याचा राग आल्याने राजेश पवार व प्रवीण पवार यांनी श्री. मचिये यांना मारहाण करून, शिवीगाळ केली. त्यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद पोलिसांत दाखल केली. ही घटना निषेधार्थ असून, हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व खोटा गुन्हा मागे घ्यावा, तसेच अशा प्रसंगांमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचरी व अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामे करताना अडथळे येऊन ग्राहकांना नियमित सेवा देणे अशक्‍य होईल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही उद्‌भवू शकतो. या पार्श्‍वभूमीवर संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असे हल्ले होणार नाहीत व दैनंदिन कामकाज करण्यात मदत होईल. 
मोर्चात एम. एस. इलेक्‍ट्रिक वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, म. रा. वी. बहुजन फोरम संघटना, आफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, म. रा. वी. विभागीय संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: electricity employee officer rally