वीजनिर्मिती मंदावली

नीलेश छाजेड
शुक्रवार, 13 जुलै 2018

राज्यातील 14 संच बंद, चार हजार मेगावॉटचा तुटवडा

राज्यातील 14 संच बंद, चार हजार मेगावॉटचा तुटवडा
एकलहरे (जि. नाशिक) - मुसळधार पाऊस, कोळसाटंचाई, देखभाल- दुरुस्ती यांसह विविध कारणांमुळे राज्यातील 14 वीजनिर्मिती संच बंद आहेत. अशातच उत्पादन खर्चाच्या कारणामुळे कंपनीने मध्यरात्रीपासून नाशिकसह काही संच "शेड्युल्ड' करीत बंद ठेवल्याने त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. राज्यात 17,109 मेगावॉट मागणीच्या तुलनेत 13,222 मेगावॉट इतकेच उत्पादन सुरू आहे. त्यात सहा हजार 88 मेगावॉट विजेची निर्मिती खासगी संचातून सुरू आहे.

वीजनिर्मितीसाठी 30 दिवसांऐवजी जेमतेम नऊ दिवसांचा कोळसा वीज केंद्राकडे शिल्लक आहे. वीजनिर्मिती केंद्राची वार्षिक गरज 615 टन असली, तरी सध्या जेमतेम 20 टन इतकाच कोळशाचा साठा आहे. जूनप्रमाणेच जुलैत कोळशाची तूट कायम आहे. 2016 मध्ये 80 टन विदेशी कोळसा आयात करणाऱ्या शासनाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी जेमतेम 13 टन कोळसा आयात केला.

कोळशाची अशी स्थिती असतानाच राज्यात काही भागांत पाणीटंचाई, तर काही ठिकाणी मुसळधार यामुळे कोळशाची टंचाई आहे. त्यातच कोळसा वाहतुकीसाठी अपुऱ्या रेल्वे वाघिणींमुळे कोळसा वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे. इकॉनॉमी व झिरो शेड्युल्डच्या नावाने काही संच बंद आहेत. विदेशातून आयात सुमारे 15 टक्के कोळसा कमी केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी राज्यात विक्रमी वीजनिर्मिती करणारे संचही बंद ठेवले आहेत. वीजनिर्मितीची कोट्यवधींची पारितोषिके मिळविणाऱ्या एकलहरे वीज केंद्राला ग्रहण लागले आहे.

यामुळे संच बंद
- मुसळधारेने कोळसा ओला
- विदेशी कोळशाच्या आयातीत घट
- देखभाल- दुरुस्तीसाठी काही संच बंद
- खासगी वीज केंद्राकडे कोळसा वळविला
- अपुऱ्या रेल्वे वाघिणी

प्रमुख बंद संच व त्याची कारणे
परळी संच 4 व 5 इकॉनॉमी शटडाउन
परळी संच 6, 7 झिरो शेड्युल्ड
नाशिक संच 5 झिरो शेड्युल्ड
कोराडी 6, 7 देखभाल- दुरुस्ती
कोराडी संच 8 नूतनीकरणासाठी
कोराडी संच 7 कोळसाटंचाई
खापरखेडा संच 7 देखभाल- दुरुस्ती
चंद्रपूर संच 3, 4 पाणीटंचाई
चंद्रपूर संच 9 देखभाल- दुरुस्ती
भुसावळ संच 3 कोळसा खासगी वीज केंद्राला वळविला

विजेची मागणी कमी असल्याने नाशिकच्या संच क्रमांक 5 ला तात्पुरते झिरो शेड्युल देण्यात आले आहे. मागणी वाढली की हा संच पुन्हा पूर्ववत कार्यान्वित होईल.
- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, नाशिक केंद्र

एकलहरे येथे 660 मेगावॉटचे काम सुरू झाल्याशिवाय येथील संच बंद करणार नाही, हे ऊर्जामंत्र्यांचे आश्‍वासन होते. आता झिरो शेड्युलच्या नावाखाली बंद ठेवले जात आहे. राज्यात कुठलाही नवीन संच झाला तर तो नाशिकला होईल, या त्यांच्याच घोषणेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
- विनायक हारक, प्रकल्प बचाव संघर्ष समिती, सचिव

Web Title: electricity generation slow