इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारपेठेत 25 कोटींची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नाशिक - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिवसभरात शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या बाजारपेठेत 25 कोटींची उलाढाल झाली. मराठी नववर्षानिमित्त गृहोपयोगी वस्तू खरेदीची परंपरा नाशिककरांनी यंदाही कायम राखली आहे. त्यात जवळपास 70 टक्के मागणी फ्रीजला राहिली. 

नाशिक - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिवसभरात शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या बाजारपेठेत 25 कोटींची उलाढाल झाली. मराठी नववर्षानिमित्त गृहोपयोगी वस्तू खरेदीची परंपरा नाशिककरांनी यंदाही कायम राखली आहे. त्यात जवळपास 70 टक्के मागणी फ्रीजला राहिली. 

वातानुकूलित यंत्रात थंडच्या जोडीला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात उष्ण हवेचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. "इनबिल्ट हीटर'मुळे वातानुकूलित यंत्राला चैत्रात पेटलेल्या वैशाख वणव्यामुळे विशेष मागणी राहील, अशी दुकानदारांची अटकळ होती. पण, रात्रीच्या वेळी अजूनही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत नसल्याने यंत्राला फारशी मागणी राहिली नसल्याचे दुकानदारांच्या निदर्शनास आले आहे. गृहोपयोगी वस्तूंमध्ये एक, दोन, तीन दरवाज्यांचे फ्रीज बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहकांचा कल पाहता, एक आणि दोन दरवाज्यांच्या फ्रीजची मोठी मागणी राहिल्याचे दिसून आले. तेरा हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे फ्रीज विकले गेले. फ्रीजच्या खालोखाल एलईडी दूरचित्रवाहिनी संचाला मागणी राहिली. संचाच्या किमतीत आठ ते दहा टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. 18 हजार 500 ते 85 हजार रुपयांपर्यंतचे मॉडेल आज विकले गेले आहेत. 

"इनबिल्ट हीटर'च्या वॉशिंग मशिन 
फ्रंट, टॉप लोडच्या पुढचे पाऊल टाकत कंपन्यांनी आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये "इनबिल्ट हीटर'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या तंत्रामुळे विक्रीत तृतीय क्रमांकावर वॉशिंग मशिन राहिल्या आहेत. वॉशिंग मशिनची किंमत 12 हजार 500 पासून 32 हजार रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, एलईडी दूरचित्रवाहिनी संचाचा अपवाद वगळता इतर गृहोपयोगी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 ते 20 टक्‍क्‍यांनी उलाढाल कमी झाली आहे. त्यामागे प्रामुख्याने वातानुकूलित यंत्राला फारशी न झालेली मागणी हे प्रमुख कारण आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी जवळपास वित्तसहाय्य योजनेवर अवलंबून असल्याने नोटाबंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही. 
- रवी पारख (संचालक, पारख इलेक्‍ट्रॉनिक्‍स) 

Web Title: Electronics market turnover of Rs 25 crore