अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

शिक्षण विभागाकडून आढावा
अकरावीचे शहरात ३० हून अधिक कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात ७ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या तिन्ही गुणवत्ता याद्यांनंतर ५ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले, तर २ हजार जागांसाठीचे प्रवेश बाकी आहे. सर्व जागांवरील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास महाविद्यालयांच्या मागणीनुसार वाढीव तुकड्यांना मान्यता देण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे पाटील यांनी दिली.

जळगाव - शहरात अकरावी कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यासाठी प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, ८० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. शहरातील विविध महाविद्यालयांत आतापर्यंत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. 

अकरावीच्या प्रथम, द्वितीय, तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. अकरावीचे प्रवेश खुले झाले असून, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी राहणार आहे.

अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीने यंदा प्रथमच उच्चांक गाठला. पहिल्या यादीत विज्ञान शाखेचा कट ऑफ ८५.८० टक्‍क्‍यांवर गेला, तर वाणिज्यचा कट ऑफ ८७.८० टक्‍क्‍यांवर गेला. त्यामुळे पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अल्प प्रमाणात झाले होते. यानंतरच्या दोन्हीही गुणवत्ता याद्या यंदा उच्चांकी राहिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या यादीनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कॉलेजात मेरिट अर्ज भरल्याने प्रवेश अर्जांची संख्या वाढली. प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दोन्ही याद्यांनंतर अल्प प्रतिसाद लाभला. अकरावीच्या शहरातील महाविद्यालयांत ७ हजार ८६० जागा आहेत. पहिल्या चारही याद्यांनुसार आतापर्यंत ८० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Admission Process in Final Step