Employee Strike : बेमुदत संप; सरकारी-निमसरकारी कार्यालयांत शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All government employees in state are indefinite strike from March 14 pune

Employee Strike : बेमुदत संप; सरकारी-निमसरकारी कार्यालयांत शुकशुकाट

नवापूर (जि. नंदुरबार) : जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करण्यासाठी १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. (employee strike old pension scheme silence in government and semi government offices nandurbar news)

बुधवारी (ता. १५) संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ संपात सक्रिय सहभागी झाले आहेत. तालुक्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालयात शुकशुकाट होता.

संपाच्या दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील सर्व संपकरी पुन्हा पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ संपासाठी टाकलेल्या पेंडालमध्ये बसून जुनी पेन्शन मागणीसाठी ठिय्या कायम ठेवला. शहरातील श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या मैदानात बसून संपात सहभागी झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्चला सभागृहात आव्हान केले, की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल तीन महिन्यांत येईल, तोपर्यंत आपण संप मागे घ्यावा; परंतु राज्य समन्वय समितीने हा प्रस्ताव नाकारलेला आहे. समन्वय समितीने बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

कोणत्याही प्रकारच्या अफवा, धमक्या मिळालेल्या चुकीच्या माहितीवरून घाबरून जाऊ नये. हे प्रकार होतच राहतील. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ या संपात सक्रिय सहभागी आहेच.

बेमुदत संपात फक्त विद्यार्थिहित डोळ्यासमोर ठेवून व परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे म्हणून दहावीच्या व बारावी बोर्ड परीक्षा कामकाज सुरळीत करावयाचे आहे. चीफ कंडक्टर, बिल्डिंग कंडक्टर, रनर, सुपरव्हिजन इत्यादी कामकाज सुरू राहील. बेमुदत संपात याव्यतिरिक्त कुठलेही कामकाज करू नये, असे आवाहन संपात सहभागी संघटनांनी केले.

संपाची तीव्रता : उत्तरपत्रिका ताब्यात घेणे, उत्तरपत्रिका तपासणी, नियमन यावर पूर्णपणे बहिष्कार आहे म्हणून कोणीही चोरूनलपून उत्तरपत्रिका तपासू नये, नियामकांनी मंडळाचे बोलावणे आल्यावरदेखील विभागीय मंडळात उपस्थित राहायचे नाही. शालेय कामकाज संपूर्ण बंद असेल.

अकरावीच्या वर्गाला शिकविणे व परीक्षा घेण्यावर बहिष्कार आहे. नियमित हजेरीपटावर उपस्थितीची सही करावयाची नाही. त्याकरिता स्वतंत्र हजेरीपत्रक तयार करून त्यावर उपस्थितीची सही करावी. ज्यांचे प्राचार्यांना निवेदन देण्याचे बाकी असेल त्यांनी तत्काळ निवेदन देऊन संपात सक्रिय सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन करण्यात आले.

"महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नंदुरबारतर्फे जिल्हा कार्यकारिणीची सभा घेऊन राज्य नेतृवाने संपातून बाहेर पडण्याचा घेतलेला चुकीचा निर्णय झुगारून एकमताने व सर्वसंमतीने निर्णय घेऊन जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सुरू असलेल्या संपास सक्रिय पाठिंबा कायम असल्याबाबत निवेदन बुधवारी नंदुरबार जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षांना सादर केले." -सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ