संघर्षातून यशस्वितेचा मंत्र मुंडेंनीच दिला - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी झाल्यानंतर इतरांचा आत्मविश्‍वास कसा वाढवायचा, याची साक्ष संस्थेच्या आवारात उभारण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यावरून विद्यार्थ्यांना कायम देत राहील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे रविवारी (ता. ३) केले.

नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी झाल्यानंतर इतरांचा आत्मविश्‍वास कसा वाढवायचा, याची साक्ष संस्थेच्या आवारात उभारण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यावरून विद्यार्थ्यांना कायम देत राहील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे रविवारी (ता. ३) केले.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, की मुंडे यांनी वंचितांच्या न्यायासाठी संघर्षाची भूमिका घेतली. संघर्ष करणाऱ्यांना संस्था व्यवस्थित चालविता येत नाही, असे म्हटले जाते; परंतु महाराष्ट्रात वैजनाथ साखर कारखाना चालवून मुंडे यांनी विधान खोटे ठरविले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, की मुंडेंनी राजकारण बाजूला ठेवून बहुजन चळवळीला प्राधान्य दिल्याने कर्तव्यापोटी समता परिषदेच्या वतीने पुतळा बसविण्यात आला. भाजप-शिवसेना युतीचे श्रेय मुंडे यांनाच जाते. शरद पवार यांच्या विरोधात मुंडेंनी कायम विरोधाची भूमिका घेतली, पण वंचितांच्या प्रश्‍नांवर दोघेही एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. राजकारणात गुगली टाकून वातावरणनिर्मिती करण्याची कला त्यांना अवगत होती. केंद्रात ओबीसींच्या जनगणनेला त्यांनी पाठिंबा दिला.
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की विरोधाची भूमिका संयमाने मांडायची, हे गोपीनाथ मुंडे यांच्याकडून शिकायला मिळाले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की ज्या दिवशी निवडणूक संपते त्याच वेळी राजकारण संपते, हे मुंडे यांच्याकडून शिकायला मिळाले.

अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार हेमंत टकले, आमदार दीपिका चव्हाण, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, वनाधिपती विनायकदादा पाटील, तुकाराम दिघोळे, समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, जगन्नाथ धात्रक, ज्ञानेशानंदशास्त्री महाराज आदी उपस्थित होते. 

संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार प्रभाकर धात्रक यांनी आभार मानले.

पवार म्हणाले...
कॅनडा कॉर्नर नावामुळे आश्‍चर्य वाटले. नाशिककर काय करतील, याचा नेम नाही
स्वातंत्र्य चळवळीत नाशिकचे मोठे योगदान
गोपीनाथ मुंडे अन्‌ माझा जन्म एकाच तारखेला झाला असल्याने संघर्ष अन्‌ जुळवून घेण्यास नक्षत्रच कारणीभूत आहे
राज्यात विरोधी पक्षनेतेपदाला महत्त्व प्राप्त करून देण्याचे श्रेय मुंडे यांनाच
मुंडेंनी वीजविस्तारातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले
एकलहरे औष्णिक वीज केंद्र बंद पडत असेल तर सरकारचं काहीतरी चुकतंय
पवार-मुंडे लवादामुळेच ऊसतोड कामगारांचा संप कायमस्वरूपी मिटला

पवारसाहेबांसाठी काहीही...
पंकजा मुंडे यांच्याकडे कामकाज घेऊन गेल्यास पन्नास लाख, एक कोटी त्या सहजपणे देतात, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषणादरम्यान करताच शरद पवार यांनी त्यांच्या हातातील कोरा कागद पंकजा यांच्यासमोर ठेवताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. याचाच संदर्भ देत पंकजा यांनी पवारसाहेबांनी समोर केलेला कागद कोरा असल्याने त्याचे दोन अर्थ निघत असल्याचे सांगून उपस्थितांना पुन्हा हसविले; परंतु कागद कोरा असला, तरी त्यांच्यासाठी सही करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करत विश्‍वास व्यक्त केला.

Web Title: Engineering College Building Sharad Pawar Politics