श्रावणातील विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव

एल. बी. चौधरी 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

श्रावणात विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी मरीआईचा घाटा कार्यक्रम होतो. त्यादिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे. आषाढच्या शेवटच्या दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी आठ ते बैलगाड्यांवर आंबा व अन्य झाडांच्या डहाळ्या ठेवून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते.

सोनगीर(जि. धुळे) -श्रावण हा मनामनांत चैतन्य निर्माण करणारा हिरवागार महिना. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण नाव पडले. ऊन-पावसाचा लपंडाव, जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्या सुवासाने आसमंत दरवळून जातो. अशा श्रावणात विविध प्रथा येथे व खानदेशात पाळल्या जातात. 

श्रावणात विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी मरीआईचा घाटा कार्यक्रम होतो. त्यादिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे. आषाढच्या शेवटच्या दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी आठ ते बैलगाड्यांवर आंबा व अन्य झाडांच्या डहाळ्या ठेवून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. त्याला मरीआईचा मंडप म्हणतात. त्या डहाळ्या व पानांनी मरीआईचे मंदिर सजवले जाते.  रोगराई निर्मुलन करणारी देवता म्हणून मरीआईला पुजले जाते. रोगराई गावात प्रवेश करू नये म्हणून मरीआई मंदिर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असते. पुर्वी घरोघरी दादर, ज्वारीचे दाणे फेकले जाई. याने प्रत्येक घर रोगराई मुक्त झाले असा समज होता. 

दर मंगळवारी वेगवेगळ्या समाजातर्फे रात्री लोकनाट्य कार्यक्रम होतो. तत्पूर्वी सायंकाळी तगतराववर कलावंताची मिरवणूक व मरीआई मंदिराजवळ सुमारे एक तासाची हजेरी कार्यक्रम होतो. त्यावेळी लोकनाट्य कलावंत विनोदी कार्यक्रम सादर करतात. श्रावणातील पहिल्या मंगळवारी परदेशी समाजातर्फे लोकनाट्याचे आयोजन केले जाते. दुसर्‍या मंगळवारी गुजर समाज, तिसऱ्या मंगळवारी पाटील समाज, चौथ्या मंगळवारी धनगर व पोळ्याला माळी समाजातर्फे लोकनाट्याचे आयोजन केले जाते. यंदा अद्यापही फारसा पाऊस न झाल्याने काही समाज लोकनाट्याचे आयोजन करणार नाहीत अशी स्थिती आहे. या दिवशी पिठाची गिरणी बंद असते. बैलांना शेतात कामाला नेत नाही तसेच गाडीला जुंपले जात नाही. शेतातील कामे बंद ठेवतात. बैलांना पुर्णपणे आराम असतो. नियम मोडणाऱ्यांना पुर्वी ग्रामपंचायतीत बोलावून ग्रामस्थांसमक्ष दंड ठरवून तो वसूल केला जाई. आता मात्र नियम परंपरेत काहीशी लवचिकता आली आहे. दर गुरुवारी आठवडे बाजार विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ भरतो मात्र श्रावणात गावाच्या उत्तर टोकाला मरीआई मंदिराजवळ भरतो. उंच टांगलेल्या नारळ उडी मारून तोडण्याची स्पर्धा पोळ्याला होत असे. ती बंद पडली. मात्र पोळ्याला मरीआई मंदिरापर्यंत बैल पळविण्याची प्रथा सुरू आहे. यात कोणतेही बक्षीस मिळत नसले तरी आमचेच बैल श्रेष्ठ हे दाखविण्यासाठीच हा प्रकार होतो.                        

Web Title: esakal news sakal news dhule news

टॅग्स