पाणी शुद्ध करण्यासाठी दर दोन तासाला चाचणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

जळगाव - शहरात गेल्या आठ-दहा दिवसापासून होणाऱ्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याबाबत ‘सकाळ’ने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा अभियंत्यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन प्रक्रियेची पाहणी केली. तसेच जलशुद्धीकरणाची चाचणी दर दोन तासाला घेऊन नंतरच पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही दिल्या. 

जळगाव - शहरात गेल्या आठ-दहा दिवसापासून होणाऱ्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याबाबत ‘सकाळ’ने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा अभियंत्यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन प्रक्रियेची पाहणी केली. तसेच जलशुद्धीकरणाची चाचणी दर दोन तासाला घेऊन नंतरच पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही दिल्या. 

शहरवासीयांना वाघुर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून पाण्याचे शुद्धीकरण उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर होते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. ‘सकाळ’ने बुधवारच्या अंकात दूषित पाण्यामुळे जळगावकरांचे आरोग्य ‘सलाईनवर’ अशा आशयाचे वृत्तही दिले. त्याची तातडीने दखल घेत आज अभियंता डी.एस. खडके  यांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत उमाळा जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. तसेच पाणीपुरवठा व शुध्दीकरणाच्या प्रक्रियेची माहिती घेऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला वातावरण बदलाने वाघुर धरणाचे पाण्याला पिवळसर रंग व दुर्गंधी येत असते. त्यामुळे पिवळसर रंग व दुर्गंधी मुक्त पाणी देण्यासाठी दर दोन तासाला पाण्याची चाचणी घेऊन पाणीपुरवठा करण्याची सूचना दिल्या. 

पाणी शुद्धीकरणासाठी विशेष काळजी

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने दूषित पाणी तक्रार निवारणासाठी विशेष नियोजन केले आहे. प्रचलित पद्धतीनुसार दिवसाला तीन वेळेस व दर आठ तासानंतर एकदा पाण्याची तपासणी करून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, आता दर दोन तासाला पाण्याची तपासणी करून त्याच्या नोंदी घेऊन पाण्याचा पिवळसर रंग, दुर्गंधी घालविण्यासाठी योग्य प्रमाणात तुरटी (ॲलम), क्‍लोरिन आदी प्रक्रियेद्वारे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती श्री. खडके यांनी दिली. 

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना 
शहरात दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. परंतु, जलवाहिनी गळतीची संख्या पाहता शहरात पाणीपुरवठा दोन-तीन दिवस उशिरा झाल्याची वेळ आल्यास नागरिकांनी पाणी देण्यासाठी शहरातील पर्यायी पाणीपुरवठा स्रोत सुरू केले आहे. यात विविध भागातील विहीर, बोअरवेलची दुरुस्ती करून ती कार्यान्वित केली आहे. तसेच वाढीव वस्तीत असलेल्या भागात टॅंकरद्वारे पाणी उन्हाळ्यात देण्याबाबतचे नियोजन पाणीपुरवठा विभागाचे सुरू आहे. 

शहरातील दूषित पाण्याची समस्या लक्षात घेऊन आज उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची माहिती घेऊन दर दोन तासाला पाण्याची तपासणी करुन ते शुद्ध करण्यासंबंधी प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डी. एस. खडके, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

Web Title: Every two hours to clean water test