काँग्रेसच्या माजी मंत्र्याला गैरव्यवहार प्रकरणी धुळ्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

दोंडाईचा पालिका क्षेत्रातील घरकुल योजना प्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार, विधी- न्याय राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा आज (ता.22) दुपारी साडेपाचला जामिनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या निर्णयाला आव्हान देणारा त्यांचा अर्जही खारीज केला. त्यामुळे पोलिस पथकाने डॉ. देशमुख यांना ताब्यात घेतले. 

धुळे : दोंडाईचा पालिका क्षेत्रातील घरकुल योजना प्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार, विधी- न्याय राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा आज (ता.22) दुपारी साडेपाचला जामिनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या निर्णयाला आव्हान देणारा त्यांचा अर्जही खारीज केला. त्यामुळे पोलिस पथकाने डॉ. देशमुख यांना ताब्यात घेतले. 

डॉ. देशमुख यांचे वय वर्षे 81 असल्याने त्यांच्या अटकेबाबत तासाभराने निर्णय होईल, असे जिल्हा पोलिस प्रशासनाने सांगितले. दोंडाईचा पालिकेने एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत 77 कोटींच्या निधीतून साकारलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये तीन वर्षापूर्वी दोंडाईचात गुन्हा दाखल झाला. त्यात दोंडाईचास्थित माजी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख, तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र भास्कर देशमुख, विक्रम बळिराम पाटील, गुलाबसिंग सुरतसिंग सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ, राजेंद्र व्ही. शिंदे, अमोल प्रभाकर बागूल यांचा समावेश आहे. तपासाअंती संशयितांमध्ये वाढ होत गेली. 

"शासनाची फसवणूक, स्वतःच्या फायद्यासाठी योजनेत अपहार, गैरव्यवहार करणे, झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी योजना न राबविता गावाबाहेर योजना राबविणे, घरकुलांचे काम निकृष्ट दर्जाचे करणे, रेल्वेच्या हद्दीत घरकुल योजना राबविणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. या प्रकरणी कृष्णा नगराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार दिली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना चौकशीचा आदेश होता. चौकशीस विलंब लागल्याने श्री. नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने स्थानिक पोलिसांना चार आठवड्यांच्या आत गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली होती. 

तपास सुरू असतानाच दोंडाईचातील माजी नगरसेवक गिरिधारी रामराख्या जानेवारीपासून अटकेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 29 जुलैला कामकाज होणार आहे. या प्रकरणात सुमारे 15 कोटींचा व्यवहार बॅंक खात्यावर झाल्याने, तसेच ते "हाय पॉवर' समितीचे सदस्य असल्याने त्यांना पोलिसांनी जानेवारीत अटक केली होती. या प्रकरणातील इतर आरोपींना अंतरिम जामीन मिळाला आहे. यात डॉ. देशमुख यांच्या दाखल जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात कामकाज होते. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणी भाजपप्रणीत सरकारकडून सत्तेचा गैरवापर आणि सूडबुद्धीने राजकारण केल्याचा आरोप डॉ. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex minister Dr. Hemnat Deshmukh is arrested