
Dhule News : प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासास गती द्यावी: जलज शर्मा
धुळे : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले. (Expediting investigation of pending crimes instructions were given by Collector Chairman Jalaj Sharma dhule news)
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, की पोलिस तपासावरील गुन्ह्यांचा तत्काळ तपास पूर्ण करून गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करावे. पोलिस तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांची माहिती समाजकल्याण विभागाकडे द्यावी.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
न्यायालयात दाखल गुन्ह्यांपैकी शाबित गुन्ह्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि पोलिस दलाने उपाययोजना कराव्यात. या कायद्यांतर्गत दाखल खून, लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर विशेष लक्ष द्यावे. या गुन्ह्यांसह प्रलंबित सर्व गुन्ह्यांची सद्य:स्थिती अवगत करावी.
समाजकल्याण विभागाने ऑनलाइन माहिती भरण्यासाठी संबंधितांकडून कागदपत्र प्राप्त करून त्वरित कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.
काळे यांची भूमिका
अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा तपास तातडीने केला जाईल. त्यासाठी पोलिस दलातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखल, तपासावरील व प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा सादर केला.