समाज उद्धारासाठी मरणोत्तरही ‘त्यांची’ दृष्टी जिवंत

सचिन पाटील
सोमवार, 4 मार्च 2019

शिरपूर - मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी, असे कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी जिवंतपणीच त्या तोडीचे सत्कार्य करून ठेवणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण तर अगदी विरळा! पण बोळे (ता. पारोळा) येथील अल्पशिक्षित मंगलबाई रतनसिंह गिरासे यांनी मात्र मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून आपली दृष्टी जिवंत ठेवली.

अवयवदानासाठी आजही विशेष चळवळी चालवणे भाग पडते, अशा काळातही समाज, कुटुंबाच्या उद्धारासाठी झटून मरणोपरांत आदर्श निर्माण करणाऱ्या मंगलबाई गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा विषय ठरल्या आहेत.

स्वयंस्फूर्तीने नेत्रदान नोंदणी
दोन फेब्रुवारीला मंगलबाईंचे निधन झाले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी २०११ मध्ये गावात सदगुरू मंगलदा फाउंडेशनतर्फे झालेल्या शिबिरात नेत्रदानासाठी स्वयंस्फूर्तीने नोंदणी केली होती. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार केईएमच्या नेत्रपेढीत नेत्रदान करण्यात आले. 

मंगलाबाईंचे भौतिक अस्तित्व तर संपले पण नेत्रदानाच्या माध्यमातून त्या या जगात असल्याचे समाधान काही कमी नाही, अशा समाधानात त्यांचे कुटुंब आहे. 

महिलांना निःशुल्क प्रशिक्षण
मंगलाबाईंचा विवाह १९९५ मध्ये रायखेड (ता. शहादा) येथे झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांना वैधव्य आले. त्या माहेरी येऊन राहिल्या. शेतमजुरी करून गुजराण करणाऱ्या वडिलांवर त्या भार झाल्या नाहीत.

शिवणकाम करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली. भाऊ व बहिणीला शिकवले. त्यांच्या प्रेरणेने भाऊ भिलेसिंह गिरासे २०१२ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला.

केवळ कुटुंबाची जबाबदारी पार पाडून त्या थांबल्या नाहीत. परिसरात बंजारा कुटुंबातील महिलांना त्यांनी शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. गाव व परिसरात शिवणकला शिकू इच्छिणाऱ्या अनेक महिला-युवतींना त्यांनी निःशुल्क प्रशिक्षण दिले.

अल्पशिक्षित बहिणीचा अभिमान
महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य सर्वाधिक महत्त्वाचे असते, ते लाभले की बऱ्याच जोखडांना झटकण्याची क्षमता येते, अशी त्यांची विचारधारा होती. ४० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मंगलबाई अशा विचारांमुळेच परिसरातील महिलांसाठी आदरणीय ठरल्या आहेत. मंगलबाईंपासून प्रेरणा घेऊन त्यांचे चुलतभाऊ कैलास गिरासे अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनिअर नेत्रदानाची चळवळ चालवीत आहेत. तेथेही त्यांनी या उपक्रमासाठी स्वतंत्र क्‍लब स्थापन केले आहेत. या कार्यासाठी ते नि:शुल्क व्याख्यानेही देतात. हा विचार मला माझ्या अल्पशिक्षित बहिणीने दिला हे ते अभिमानाने सांगतात.

Web Title: Eye Donate Mangalbai Girase Motivation