शेतकऱ्याच्या लेकीची स्पर्धा परीक्षेतून बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

पुण्यातील ऑफिसर्स क्लब या अभ्यासिकेत रोज आठ ते दहा तास अभ्यास करून होस्टेलमध्ये राहणारी ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी अवघ्या तीनच वर्षांत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेऊ शकली आहे. स्पर्धा परीक्षेत मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावत बालविकास प्रकल्प अधिकारी पदासाठी गवसणी घातली आहे.

येवला : नागडे सारख्या छोट्या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील घरात कुठलाही वारसा नसताना भारती साताळकर या शेतकऱ्याच्या लेकीने स्पर्धा परीक्षेत मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावत बालविकास प्रकल्प अधिकारी पदासाठी गवसणी घातली आहे. तिच्या यशाचे तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे. तयारीतील सातत्य व त्यासाठी संयम असला तर तुम्ही नक्कीच यशाच्या जवळ जाऊ शकतात असा फोर्मुला ती सांगते.

येवल्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील नागडे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली ही मुलगी पुढे आठवी ते दहावीच्या शिक्षणासाठी सायकलवर येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालय यायची. येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात बीएस्सीची पदवी संपादन केल्यानंतर बीएड किंवा तत्सम शिक्षणाच्या आणि त्यातून मिळणाऱ्या नोकरीच्या मागे न लागता तिने वर्षभर मनाची तयारी केली अन स्पर्धा परीक्षेसाठी गाठले ते थेट पुणे...

पुण्यातील ऑफिसर्स क्लब या अभ्यासिकेत रोज आठ ते दहा तास अभ्यास करून होस्टेलमध्ये राहणारी ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी अवघ्या तीनच वर्षांत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेऊ शकली आहे. २०१६ मध्ये वनविभागाच्या अधिकारी पदासाठी अवघ्या एक गुणांनी संधी हुकल्यानंतर तिने पुन्हा मागे वळून बघितलेच नाही. डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महिला बालविकास प्रकल्प अधिकारी पदासाठीची परीक्षा तिने दिली आणि २१ जूनला लागलेल्या निकालात ती घवघवीत यश मिळवत राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली आहे. ऑगस्टमध्ये ती या पदावर रुजू होणार आहे.

आता पुढील महिन्यात तहसीलदार,उपजिल्हाधिकारी पदासाठी होणारी राज्यसेवा लोकसेवा आयोगाची परीक्षा तिला द्यायची आहे. त्यासाठीची तयारी सध्या ती पुण्यात करत आहे. वडील शेती करतात मात्र तीचे हे यश या कुटुंबाला नक्कीच सुखावणारे ठरत आहे. तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना ती पुण्यातच अभ्यासामध्ये मग्न आहे.

“बीएससीची पदवी संपादन केल्यानंतर पुढे काय करावे हा विचार घोंगावत असताना अगदी बारावी पासून अधिकारी होण्याची पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुना गाठले. येथे महागडे क्लास लावले नसले तरी अभ्यासिका आणि होस्टेलवर मी पूर्णवेळ स्पर्धापरीक्षेची तयारी केली. त्याचे फलित म्हणजे माझे यश आहे.संयम ठेवून जिद्द मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश शक्य आहे अर्थात कुटुंबियांचा सपोर्ट यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मी मानते.”
- भारती साताळकर, नागडे (येवला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers daughter Selected as Child Development Project Officer through Competitive Examination