नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

शेतमाल वाहतुकीत मदत लागत असल्यास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस अधीक्षक किंवा थेट वैयक्तित माझ्याशी संपर्क साधू शकता. आवश्‍यक तो पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. 
- राधाकृष्णन बी (जिल्हाधिकारी नाशिक)

नाशिक : संपाच्या उद्रेकात सुरक्षित शेतमाल वाहतुकीसाठी जिल्ह्यात 'सुरक्षित कॉरिडॉर' तयार करून 194 ट्रक भाजीपाला घेऊन नाशिकमधून रवाना केले. तसेच हिंसक 
कारवायांमध्ये बघ्याची भूमिका घेणाऱ्या 4 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रशासनाचा संपाला विरोध नाही; मात्र संपाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न मात्र खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व पोलिस अधीक्षक अकुश शिंदे यांनी इशारा दिला. 

दोन दिवसांपासून सौम्य भूमिकेतील जिल्हा यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी संप मिटल्याचे जाहीर केल्यापासून कडक भूमिकेत आहे. जिल्ह्यात मालवाहतूक ठप्प पडू नये, म्हणून शेतमाल वाहतुकीसाठी 'सुरक्षित कॉरिडॉर' तयार केला आहे.

नाशिकमधून शेतमाल वाहतूक ठप्प पडल्याने मुंबईच्या बाजारात परिणाम झाल्याने प्रशासनाने मध्यरात्री बैठका घेत जिल्ह्यातून 194 ट्रक पोलिस संरक्षणात रवाना केले. त्यात 65 भाजीपाल्याचे तर इतर कांद्याचे याप्रमाणे साधारण 194 ट्रक टॅंकरची वाहतूक झाली. याशिवाय नाशिक शहरासाठी 11 दुधाचे टॅंकर दाखल झाले. शेतमाल पुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारीही बाजार समित्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी आज बाजार समित्यांच्या पदाधिकारी, व्यापारी, मालवाहतूकदारांशी चर्चा करून मालवाहतुकीचे नियोजन केले. 

पोलिस पाटील 'लक्ष्य' 
संपाला हिंसक वळण देण्याच्या प्रयत्नात 10 ते 15 गुन्हे दाखल केले असून, 150 जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, की पिंपळगाव जलाल व उंदरवाडी शिवारातील सुमारे 42 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. वडनेर खाकुर्डी येथे बटाट्याचा ट्रक लुटल्याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतले. पिंपळगाव जलाल येथील पोलिस पाटलांना निलंबित केले असून, ज्या गावात हिंसक कारवाया होतील, तेथील पोलिस पाटलांवरही कारवाया केल्या जाणार आहेत. 

'शेतकरी संपा'विषयी अधिक बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

कांदा व्यापाऱ्यांना संरक्षण 
नाशिकहून मुंबईहून दररोज सुमारे 300 ट्रक कांदा जातो; मात्र दोन दिवसांत एकही ट्रक मुंबईकडे गेलेला नाही. त्यामुळे रात्री एकला लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांची बैठक घेत कांदा वाहतुकीसाठी पोलिस सरंक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पडून असून, हा कांदा निर्यातीसाठी आता व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: farmers strike nashik news marathi news agriculture sakal eskal