रस्त्यासाठी नांदगावात पुन्हा एकदा बेमुदत उपोषण

fasting once again in Nandgaon for the road
fasting once again in Nandgaon for the road

नांदगाव - दळणवळणाचा रस्ताच नादुरुस्तीच्या भोवऱ्यात सापडल्याने तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या अठरा किलोमीटरच्या अंतरावर असलेलेल्या कळमदरीच्या ग्रामस्थांवर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची वेळ ओढविली आहे. यावेळचे उपोषण गावकरी सामूहिकरित्या करणार आहेत. त्यासाठी गावातील तरुणांनी फेसबुकवरून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. तसा निर्धार गावातील युवकांनी स्थानिक सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून विविध पोस्ट टाकीत व्यक्त केला आहे. 

गिरणा धरणाच्या काठावर कळमदरी हे प्रमुख गाव आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ते ओळखले जाते गावात जाण्यासाठी वेहेळगाव व्हाया गिरणा धरण असा रस्ता असला तरी जास्तीचा वापर मात्र न्यू पांझण व्हाया साकोरा अशा मार्गाने होत असतो. नांदगावशी सर्वार्थाने कनेक्टिव्हीटी असल्यामुळे साकोरा मार्गे न्यू पांझण मार्गे जाता येते व  वर्षानुवर्षे गावकरी याच रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. कारण  दैनंदिन वाहतुकीसाठी नांदगावला जाण्यायेण्यासाठी हा एकमेव मार्ग जवळचा व सोयीचा आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमालाची विक्री करावयाची असेल तर याच रस्त्याचा वापर करावा लागतो उच्च शिक्षणासाठी नांदगावला अथवा जिल्ह्यात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो गावात एखादा आजारी पडला तरी त्या रुग्णाला या रस्त्यानेच उपचारासाठी न्यावे लागते. एकूणच दळणवळणासाठी सोयीचा असलेला हा रस्ता साकोरा गाव सोडल्यावर काही अंतरावरचे वळण घेतल्यावर पुढे थेट कळमदरी गाठण्यासाठी सोयीस्कर आहे त्यासाठी चौदा ते पंधरा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मग वाहन कुठलेही असो त्याला गावापर्यंत पोहोचताना एका दिव्यातून जावे लागते खड्डे तरी किती म्हणावे शिवाय खड्डा चुकवायचा तरी कसा व किती वेळा अशी दुरावस्था पडलेल्या खड्ड्यांची झाली आहे रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे अर्जफाटे झाले की तेवढ्यापुरते खड्डे बुजवण्याचे काम करायचे पण खड्डे एवढ्या प्रमाणात झाले की एखादा खड्डा बुजविले तरी पुढचा खड्डा तसाच राहतो. काही वर्षांपूर्वी या रस्त्यातील खड्यात वृक्षारोपण केले होते. ग्राम पंचायत स्तरावर पाठपुरावा झाला तरी मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. तालुक्यातील अन्य भागातील रस्त्यांसाठी निधी मिळतो मात्र कळमदरी कडे दुर्लक्ष होत असते त्यातून गावातल्या ग्रामस्थांनी आता सामूहिक रित्या बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे येत्या २८ मार्चपासून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच देविदास पगार यांनी दिली. 

गावातील तरुणांच्या फेसबुकवरील तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया..

अमोल पगार - गेल्या तीन पिढ्यापासून आमच्याकडील रस्त्याची अशी दुरावस्था आहे. आमच्या पूर्वजांनी सहन केले ते आम्ही सहन करणार नाही. 

कविता पाटील - रस्त्यात खड्डे कि रस्ता हेच समजत नाही, 

संदीप पगार - प्रशासनालाच खड्ड्यात चालण्याची वेळ आली आहे, 

रविंद्र सूर्यवंशी - इतर भागातील रस्ते चांगले असुनही परत परत त्याच रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळते, त्यामुळे खरोखरच राजकारण न करता आता सामुहीक लढा देण्यासाठी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. 

चेतन पगार - दहा वर्षे एकाच आमदार असून देखील गाव मात्र तालुक्याला जोडले गेले नाही, हे गावाचे दुर्दैव आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com