किरकोळ वादातून बापलेकावर जिवघेणा हल्ला, वडिलांचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नाशिक - नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्री करणाऱ्या बाप - लेकांवर वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून पाच संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात उसळविक्रेते नरसिंग गोपीनाथ शिंदे (42, रा. अरिंगळे गळा, श्रीकृष्णनगर, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून निर्घृणपणे खून करण्यात आला तर, त्यांचा मुलगा संदीपवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मुलगा गंभीररित्या जखमी आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. यात एक संशयित अल्पवयीन मुलगाही आहे.

नाशिक - नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्री करणाऱ्या बाप - लेकांवर वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून पाच संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात उसळविक्रेते नरसिंग गोपीनाथ शिंदे (42, रा. अरिंगळे गळा, श्रीकृष्णनगर, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून निर्घृणपणे खून करण्यात आला तर, त्यांचा मुलगा संदीपवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मुलगा गंभीररित्या जखमी आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. यात एक संशयित अल्पवयीन मुलगाही आहे. सदरची घटना रविवारी (ता.21) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अरिंगळे मळ्यात घडली. 

मारुती नरसिंग शिंदे (रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड) याच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक शंकर पाडळे (26), आकाश शंकर पाडळे (23), अमोल शंकर पाडळे (24, रा. अश्‍विनी कॉलनी, नाशिकरोड), सुरेश ऊर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे (42, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) व सोनवणे याचा अल्पवयीन मुलगा अशी संशयितांची नावे आहेत. 

नरसिंग शिंदे यांचा नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्रीचा गाडा आहे. रविवारी (ता.21) रात्री 9 वाजेच्या सुमारास ज्याठिकाणी शिंदे यांची चारचाकी कार (एमएच 15 एफएफ 6962) पार्क करायची होती, त्याठिकाणी संशयित दीपक पाडळे याची दुचाकी पार्क केलेली होती. ती दुचाकी नरसिंग शिंदे याचा मुलगा मारुती बाजुला सरकावित होता. त्यावेळी संशयित पाडळे याने, गाडीला हात लावू नकोस, तू बादशहा झालास का? गाडी कोणाची आहे, हे तुला माहीत नाही का? असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. ते पाहून नरसिंग शिंदे आले आणि त्यांनी संशयित दीपक पाडळे यास समजावून सांगत होते. या वादाचे पर्यावसन झटापटीपर्यंत झाले. परंतु, त्यावेळी आसपासच्या विक्रेत्यांना वाद मिटविले. त्यांनतर शिंदे बापलेक घरी गेले. त्यांचा मोठा मुलगा संदीप हाही उसळ विक्रीचा गाडा लावतो. तो घरी आला नाही, म्हणून नरसिंग शिंदे हे घराबाहेर त्याला पाहण्यासाठी गेले असता, काही वेळात संशयित पाडळे याने संशयितांच्या मदतीने दोघा बापलेकांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. 

मारुती शिंदे व त्याची आई सरस्वती हे घराबाहेर आले असता, बापलेकांना मारहाण सुरू असल्याचे पाहिले. संशयित अमोल पाडळे याने नरसिंग शिंदे यांना धरून ठेवले होते, तर संशयित पिंट्या उर्फ सुरेश सोनवणे याने धारदार शस्त्राने नरसिंग शिंदे याच्यावर वार करून पोटात खुपसला. तर संशयित दीपक पाडळे व त्याचे साथीदार हे संदीपलाही लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत होते. आरडाओरडा पाहून आसपासचे नागरिक जमा झाल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी नरसिंग शिंदे यांना मुलगा मारुती व नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, अतिरक्तस्त्राव व गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच, संदीप शिंदे याच्यावरही धारदार शस्त्राने वार झाले असून त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हेशाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चारही संशयितांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर करीत आहेत.

Web Title: father murder in nashik because of some argument