पत्नी निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

गेल्या पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर अनिल जाधव या जन्मदात्या बापाने जयश्री आणि तिचा लहान भाऊ भूषण यांना आईचे प्रेम देण्याऐवजी जयश्रीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात या नराधमाने दोघांना डांबून ठेऊन अत्याचार सुरु केले होते. पोटच्या गोळयाशी कुकर्म केल्यामुळे जयश्री गरोदर राहिली.

नाशिक : तळवाडे दिगर (ता.बागलाण) येथे जन्मदाता बाप आणि लेकीच्या नात्यालाच काळिमा लावणारी संतापजनक घटना  उघडकीस आली आहे. स्वतःच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीचा जळालेला मृतदेह मंगळवार (ता.२६) रोजी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीची ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

आईचे प्रेम देण्याऐवजी जयश्रीचा मानसिक व शारीरिक छळ...
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील अनिल रामदास जाधव शेत मोलमजूरी करतात. सुनील यास जयश्री अनिल जाधव (वय १५) व भूषण अनिल जाधव ही दोन मुले आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर अनिल जाधव या जन्मदात्या बापाने जयश्री आणि तिचा लहान भाऊ भूषण यांना आईचे प्रेम देण्याऐवजी जयश्रीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात या नराधमाने दोघांना डांबून ठेऊन अत्याचार सुरु केले होते.

मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे उघड

पोटच्या गोळयाशी कुकर्म केल्यामुळे जयश्री गरोदर राहिली. सोमवारी (ता.२५) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंधारात राहत्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागी जयश्रीचा जळालेला मृतदेह आढळून आला. ती ऐंशी टक्के भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तत्काळ जयश्रीचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. सटाणा पोलिसांनी संशयित मुलीचा बाप अनिल जाधव यास अटक केली आहे.

शवविच्छेदनात मुलीच्या पोटात सात महिन्याचा गर्भ
जयश्रीच्या मृतदेहाचे  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनात जयश्रीच्या पोटात सात महिन्याचा गर्भ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवल्याने नराधम पित्याच्या अत्याचारामुळेच मुलगी गरोदर झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. दरम्यान गेल्या ५ ऑक्टोबर २०१४ रोजी जयश्रीचची आई आशाबाई यांनी देखील पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादी संभाजी बिरारी यांनी केला आहे. हा दुर्दैवी प्रकार घडत असतांना देखील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केल्यामुळे कोवळ्या जीवाचा दुर्दैवी अंत झाल्याचे जयश्रीचे मामा संभाजी बिरारी यांनी सांगितले.

हेही वाचा > दोन तास उलटूनही मुली आल्या नाहीत..पालक घाबरले..

मामांनी दिलेल्या तक्रारी वरून मुलीच्या बापाला तत्काळ अटक
सटाणा पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या बापाला तत्काळ अटक केली आहे. मुलीच्या मामांनी दिलेल्या तक्रारी वरून त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बलात्कार, लहान मुलांचे लैगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर तपासात मुलाचे जबाब आणि अन्य पुरावे मिळाल्यानंतर त्याच्यावर हत्येचा वाढीव गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जयश्रीच्या शरीराने पेट घेतल्यानंतर तिचा भाऊ भूषण अथवा शेजार्‍यांना तिच्या किंचाळण्याचा आवाज का आला नाही ? त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत आज तरी प्रश्न चिन्हच आहे.

हेही वाचा > जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 

हेही वाचा > थरारक अपघात....गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father rapes daughter repeatedly at Nashik Crime News Marathi News