अंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण 

अंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण 

नाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित संदीप भीमराव कांबळे याच्याविरोधात तब्बल चार दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंध शाळेच्या मानसी वाझट (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी (ता.13) शाळेचा संशयित कनिष्ठ काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याने दारूच्या नशेत शाळेतील 14 ते 17 वयोगटातील दिव्यांग पाच मुलांना लाथाबुक्‍क्‍यांनी आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये एकाच्या डोक्‍याला तर एकाच्या कानाला गंभीर दुखापत झालेली आहे. याप्रकरणी तब्बल चार दिवसांनी पोलिसांत फिर्याद देत संशयित कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच वाच्यता झाली होती; परंतु शाळेच्या मानसी वाझट या निवासी न राहता शहरातील त्यांच्या घरी राहतात. त्यामुळे काळजीवाहक कर्मचारी कांबळे याच्याकडून नेहमीच दिव्यांग मुलांना मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे मुलांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापतींनीही प्रत्यक्ष अंध शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली. त्यामुळेच अखेरीस संशयित कांबळे याच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

दोषींवर कारवाई करा 
अंध मुलांना केलेल्या मारहाणीतील दोषींवर कडक कारवाई करा. अशा मागणी आज अपंग अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी नितीन पाटील यांच्याकडे करण्यात आली. याबाबत मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, दत्तू बोडके, शोभा काळे, प्रसन्ना राव यांनी याबाबत निवेदन दिले. कारवाई केली नाही तर अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com